लवादाने राज्य सहकारी बँकेच्या एका संचालकाला अपात्र ठरविल्याने बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांना जीवदान मिळाले. काल फळदेसाई यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या चर्चेनंतर झालेल्या मतदानात ७ विरुद्ध ७ अशी संख्या झाली.लवादाने रामचंद्र मुळे गटातील विद्या परब या संचालक सदस्याला अपात्र ठरविले. परब यांच्या निवडणुकीस आव्हान देणारा अर्ज लवादाकडे प्रलंबित होता. तो निकालात काढल्याने मुळे गटाची संख्या कमी झाली.
आपल्याकडे दिलेल्या संचालक सदस्यांच्या यादीत विद्या परब यांचे नाव नव्हते. त्यामुळे परब यांना मतदानात भाग घेता आला नाही, असे सहकार निबंधकांचे निरीक्षक अनिल के. देसाई यांनी सांगितले.
उल्हास फळदेसाई यांच्या बाजूनेही बहुमत नसल्याने त्यांनी पदाचा राजीनामा सादर करावा, अशी मागणी रामचंद्र मुळे गटाचे प्रतिनिधी दत्तात्रय नाईक यांनी केली.
गेल्या २३ मे रोजी वरील अविश्वासाच्या ठरावावर चर्चा होणार होती. ती झाली नाही. त्यामुळेच न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. गेल्या सात महिन्यांच्या काळात बँकेचा कारभार ठप्प झाल्याचे नाईक यांनी सांगितले. विद्या परब यांना अपात्र ठरविण्याच्या बाबतीत आपला कोणताही संबंध नसल्याचे उल्हास फळदेसाई यांनी सांगितले.