गोवा राज्य सहकारी बँकेच्या २००७ ते २०१७ या दहा वर्षातील कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत काल केली.
कॉँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी गोवा राज्य बँक प्रकरणी श्वेत पत्रिका जारी करण्याची मागणी केली आहे. त्यावर बोलताना माजी आमदार फळदेसाई म्हणाले की, कॉँग्रेसशी संलग्न असलेल्या व्यक्तीने गोवा राज्य सहकारी बँक डबघाईत आणली आहे. भाजप सरकारने सहकारी बँकेचा कारभार रूळावर आणण्यासाठी तज्ज्ञ प्रशासकांची नियुक्ती केली आहे. बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक घेण्यात आलेली नाही. आमदार रेजिनाल्ड यांच्याकडून दिशाभूल केली जात आहे, असा आरोप फळदेसाई यांनी केला.
आमदार रेजिनाल्ड यांच्याकडून कॅसिनो प्रकरणी दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. ठराविक काळानंतर आमदार रेजिनाल्ड यांच्याकडून कॅसिनोविरोधात आवाज उठविला जातो, असा दावा फळदेसाई यांनी केला.
गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांच्याकडून कोळसा प्रकरणी बिनबुडाची व दिशाभूल करणारी विधाने केली जात आहेत असा आरोप भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी यावेळी केला. म्हादई नदीच्या पाणी प्रश्नाबाबत कॉँग्रेसने भूमिका निश्चित करावी. या प्रश्नाबाबत कर्नाटक गोवा कॉंग्रेसची भूमिका वेगवेगळी आहे, असे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी सांगितले. सरकारची आर्थिक स्थिती भक्कम आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आर्थिक स्थिती योग्य ठेवण्यासाठी सक्षम आहेत, असे प्रेमानंद म्हांबरे यांनी सांगितले. शांताराम नाईक यांच्याकडून आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल केली जात आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आर्थिक स्थितीबाबत स्पष्टीकरण केलेले आहे, असेही म्हांबरे यांनी सांगितले.