राज्य सरकारने मेगा प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका जारी करावी

0
6

>> गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांची मागणी

राज्यात विविध ठिकाणी मेगा प्रकल्पाचे प्रस्ताव आहेत. मेगा प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने मेगा प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.

सांकवाळ – कुठ्ठाळी येथील भूतानी प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांनी आवाड उठविल्यानंतर राज्य सरकारला जाग आली असून भूतानी कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. दक्षिण गोव्याप्रमाणेच उत्तर गोव्यातील रेईश मागूश ग्रामपंचायत क्षेत्रातील डोंगराळ भागात दोन मेगा प्रकल्पाचे काम सुरू झाले असून रेईश मागूश येथील डोंगर पोखरण्यात आला आहे. रेईश मागूश येथील दोन मेगा प्रकल्पाबाबत संबंधित यंत्रणेकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तथापि, या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही, असा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केला.

राज्यातील भाजप सरकारमधील काही मंत्री रियल इस्टेट कंपन्यांचे दलाल म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील जमिनी हडप करण्याचे प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार आहे, असेही कवठणकर यांनी सांगितले.

थिवी येथील कोमुनिदादची मोठ्या प्रमाणात जमीन एका खासगी विद्यापीठाला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. याबाबतची एक सूचना जारी करण्यात आली असून नागरिकांकडून सूचना, आक्षेप देण्याची विनंती करण्यात आली आहे. खासगी विद्यापीठाच्या नावाने जमीन ताब्यात घेऊन नंतर तिचे रूपांतर करून मेगा प्रकल्प उभारले जाऊ शकतात, असा आरोप काँग्रेसचे नेते तुलियो डिसोझा यांनी केला.