मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; जीएसटी, व्हॅटमधून आलेल्या कराचाही समावेश
2023 च्या तुलनेत एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत सरकारी तिजोरीत 365.43 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
सरत्या 2024 या वर्षात सरकारच्या महसुलात वाढ झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत तिजोरीत 4249.34 कोटी रुपये जमा झाले होते. सरत्या 2024 मध्ये एप्रिल ते डिसेंबरपर्यंत 4614.77 कोटी रुपये जमा झाले आहेत. यंदाच्या डिसेंबरमध्ये गत वर्षीपेक्षा 75.51 कोटी रुपयांचा अधिक महसूल जमा झालेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पर्यटनासह जीएसटी, व्हॅटमधून आलेल्या कराचाही महसूल वाढीत समावेश आहे. राज्यात पर्यटकांचा आकडा वाढल्याने महसूल वाढण्यास मदत झाली आहे. राज्याचा जीएसटी महसूल 9 महिन्यांत 9.62 टक्क्यांनी वाढला आहे. कर सुधारणा व आर्थिक व्यवहार वाढल्याचा हा परिणाम आहे. राज्याचा मूल्यवर्धित कर (व्हॅट) गेल्या वर्षाच्या तुलनेत 6.41 टक्क्यांनी वाढला आहे. जीएसटी आणि व्हॅट एकत्रित केला तर ही वाढ 8.60 टक्के होते, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.