राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद ९ महिने रिक्त

0
17

>> नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत उदासीनता; कामकाज ठप्प; तक्रारी प्रलंबित

गोवा राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद मागील ९ महिने रिक्त असून, सरकारी पातळीवर महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत उदासीनता दिसून येत आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने आयोगाचे कामकाज ठप्प झाले असून, अनेक तक्रारी प्रलंबित आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. विद्या गावडे यांचा कार्यकाळ गेल्या मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाल्यानंतर नवीन अध्यक्षांची अद्याप नियुक्ती झालेली नाही. महिला व बाल कल्याण खात्याच्या अखत्यारित गोवा राज्य महिला आयोगाचा समावेश होत असून, सध्या हे खाते विश्‍वजीत राणे यांच्याकडे आहे.

महिला आणि बाल कल्याण खात्याने गोवा राज्य महिला आयोगाच्या नवीन अध्यक्ष नियुक्तीबाबतची फाईल मंत्रालयात कित्येक महिन्यांपूर्वी पाठविली आहे, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली.

आयोगाच्या कार्यालयात पीडित्र महिलांकडून तक्रार सादर केल्या जात आहेत. या तक्रारी फाईलमध्ये केवळ नोंद करून ठेवण्याचे काम केले जात आहे. आयोगाचे अध्यक्षपदी रिक्त असल्याने तक्रारीवर कार्यवाही होत नाही. आयोगाकडे तक्रार करणार्‍यांकडून आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधून तक्रारीवरील कार्यवाहीबाबत विचारणा केली जात आहे; मात्र तक्रारींवर कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार महिलांच्या प्रश्‍नाबाबत गंभीर असल्याचे वारंवार सांगितले जाते; पण प्रत्यक्षात मागील ९ महिने रिक्त असलेल्या महिला आयोगाचे अध्यक्षपद भरण्याकडे लक्ष दिले जात नाही, अशी प्रतिक्रिया पीडित महिलांकडून व्यक्त केली जात आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्या ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी मे २०२२ मध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत महिला आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यासाठी जून २०२२ ही मुदत दिली होती. या तारखेला आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती न केल्यास मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा एका पत्रकार परिषदेत त्यांनी दिला होता; मात्र तरीही आयोगाच्या अध्यक्ष नियुक्तीच्या प्रश्‍नाकडे पुन्हा लक्ष दिले गेलेले नाही.

ऍड. शैलेश कुलकर्णी यांनी गोवा महिला आयोगाच्या रिक्त असलेल्या पदाबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे एका निवेदनाद्वारे २ नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रार केली असून, नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

आयोगाला पूर्णवेळ सदस्य सचिव सुध्दा नाही

राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद ९ महिने रिक्त असले, तरी मागील आठ-नऊ महिन्यांच्या काळात आयोगाच्या सदस्य सचिवपदावर तीन-चार अधिकार्‍यांची नियुक्ती व बदली करण्यात आलेली आहे. आता, आयोगाला पूर्णवेळ सदस्य सचिव सुध्दा नाही.