राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत दिल्लीत वरिष्ठांसमवेत पुन्हा चर्चा

0
5

>> डिसेंबर महिन्यातच फेरबदल होण्याची दाट शक्यता; आयारामांना संधी मिळणार

गोवा राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयाला पुन्हा एकदा गती प्राप्त झाली आहे. राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर आता नवी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत खलबते सुरू असून, डिसेंबर महिन्यात फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमुळे गोव्यातील मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर चर्चा बंद ठेवण्यात आली होती. आता, राज्यातील मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर चर्चेसाठी सत्ताधारी गटातील मंत्री, आमदार हे नवी दिल्ली येथे जाऊन वरिष्ठ भाजप नेत्यांशी चर्चा करीत आहेत. काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये दाखल झालेल्या तिघांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यातील एकाला मंत्रिपद देण्यात आले आहे, तर दोघेजण मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. संकल्प आमोणकर यांनी बालभवनाचे अध्यक्षपद नाकारलेले आहे.

राज्याच्या नेतृत्वामध्ये कोणताही बदल होणार नाही; मात्र मंत्रिमंडळात फेरबदल निश्चित होणार आहे. राज्य मंत्रिमंडळातून कुणाला वगळून कुणाची वर्णी लावायची याचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. त्यासाठी केंद्रीय ज्येष्ठ नेते गोव्यातील मंत्री, आमदार यांच्याशी वैयक्तिकरित्या चर्चा करीत आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

राज्यातील एका नेत्याला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल उच्चपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री नियुक्तीवर विचारमंथन सुरू झाले आहे. गेल्या वेळी भाजपच्या कार्यकाळात दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केले होते. आमदार दिगंबर कामत यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.