>> गोवा ऍथलेटिक असोसिएशनचे सचिव परेश कामत यांची माहिती
गोवा ऍथलेटिक असोसिएशनचा (जीएए) सुवर्णमहोत्सवी राज्य क्रीडा मेळावा २७ व २८ ऑक्टोबर रोजी बांबोळी येथील ऍथलेटिक स्टेडियमवर होणार असून यात फोटो फिनिश कॅमेर्याचा प्रथमच उपयोग केला जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे सचिव परेश कामत यांनी काल मंगळवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर विश्वेश मोरजकर, गुरु सावंत, अनिता रॉड्रिगीस, वृंदा वेर्णेकर व सोनाली शेट्येकर हे मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून क्रीडा संचालक व्ही.एम. प्रभुदेसाई व टीजेएसबी बँकेचे विभाग प्रमुख अरुण भट तर अध्यक्ष म्हणून असोसिएशनचे अध्यक्ष व खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री. कामत यांनी पुढे बोलताना दिली. शाळा, क्लब, महाविद्यालये मिळून एकूण ७३ संस्थांतील १२०० पेक्षा जास्त खेळाडूंनी या मेळाव्यासाठी नोंदणी केल्याचे सांगताना ८,१०, १२, १४, १६, १८, २० वर्षांखालील मुलामुलींसाठी तसेच महिला व पुरुष गटात ही स्पर्धा खेळविण्यात येणार असून काणकोण, धारबांदोडा, केपे, सांगे, वाळपई आदी ग्रामीण भागातील खेळाडूंच्या निवासाची तसेच खाण्यापिण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे असे श्री. कामत म्हणाले.या क्रीडा मेळाव्यादरम्यान क्रीडाक्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल व्ही.एम. प्रभुदेसाई, बाप्तिस्ट डिसोझा, सहदेव मांद्रेकर, सुधाकर नाईक, जोवितो लोपीस, सुदेश लुजेकर, किशोर आंगले, राजू गोसावी, सिलिन डिसोझा ई डायस, लॅन्सी सिकेरा (मरणोत्तर), फ्रान्सिस्को ब्रागांझा (मरणोत्तर), सुगंध वायंगणकर (मरणोत्तर) व दायगो ब्रागांझा (मरणोत्तर) यांचा गौरव केला जाणार आहे.