काही दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावसाने गोव्यात जोरदार हजेरी लावली. काल दिवसभर राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे राजधानी पणजीसह मडगाव, वास्को, म्हापसा, फोंडा आदी विविध शहरांबरोबरच ग्रामीण भागांतील जनजीवनही विस्कळीत झाले.
सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच ऑफिस व अन्य ठिकाणी कामानिमित्त जाणार्या लोकांची बरीच धांदल उडाली.
राज्यात पुढील पाच-सहा दिवस असाच पाऊस कोसळण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. या काळात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार असल्याचे वेधशाळेचे संचालक साहू यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात सध्या शेतीची कामे जोरात सुरू असून चांगला पाऊस होत असल्याने शेतकरी वर्ग आनंदात आहे. राज्यातील ग्रामीण भागात नांगरणीची कामे जोरात सुरू आहेत. केपे, काणकोण आदी तालुक्यात मिरची लागवडीचे कामही सध्या जोरात सुरू आहे.
समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांसह अन्य कुणीही समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आलेला आहे.