राज्यात 9 जुलैपर्यंत जोरदार पाऊस

0
10

>> हवामान खात्याने वर्तवला अंदाज

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात दमदार पाऊस झालेला असतानाच 9 जुलैपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज 6 ते 9 जुलैपर्यंत हवामान खात्याने राज्याला पिवळा इशारा दिलेला असून या काळात राज्यातील काही भागांत मुसळधार तर काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

गुरुवारपासून राज्यात जोरदार पाऊस कोसळला. गेल्या 24 तासांत वेगवेगळ्या भागांत जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत म्हापसा येथे 109 मी. मी., पेडणे येथे 43.4 मी. मी., फोंडा येथे 106 मी. मी., पणजी येथे 46.1 मी. मी., जुने गोवे येथे 62.8 मी. मी. सांखळी येथे 75.2 मी, मी., काणकोण येथे 79.4 मी. मी., दाबोळी येथे 32.8 मी. मी., मडगाव येथे 95.0 मी. मी., मुरगाव येथे 35.2 मी. मी., केपें येथे 70.2 मी. मी. तर सांगे येथे 122.2 मी. मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून राजधानी पणजीसह मडगाव तसेच अन्य शहरे व गावात जोरदार पाऊस झाला आणि अजूनही पावसाचा जोर सुरूच असल्याने गोवाभरात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 62 मृत्यू, 21 लाख लोकांना फटका

आसामध्ये पुरामुळे आतापर्यंत 62 जणांचा मृत्यू झाला असून 29 जिल्ह्यांतील 21 लाख 13 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील पुरात बुडून आतापर्यंत एकूण 31 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, तर 82 प्राण्यांना पुरातून वाचवण्यात यश आले आहे. 57018 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.
सध्या 39,338 बाधित लोक 698 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. विविध एजन्सींनी बोटींचा वापर करून एक हजारांहून अधिक लोक आणि 635 प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. कामरूप (महानगर) जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे, जेथे ब्रह्मपुत्र, दिगारू आणि कोलोंग नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. काझीरंगामध्ये आतापर्यंत 31 प्राण्यांचा बुडून मृत्यू झाला असून 82 जणांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश आले आहे. यात 23 हरणांचा बुडून मृत्यू झाला तर 15 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांनी इतर प्राण्यांसह 73 हरीण, सांबर आणि एक स्कोप उल्लू यांची सुटका केली आहे. सध्या 20 जनावरांवर उपचार सुरू आहेत तर 31 इतर प्राण्यांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याने आज 6 जुलै रोजी गोव्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, महाराष्ट्र, किनारपट्टीवरील कर्नाटकात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस तसेच अतिवृष्टीचा इशारा आहे. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, केरळ या 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनची तूट भरणार
देशात मान्सूनच्या पावसाची कमतरता सामान्यपेक्षा फक्त 3% कमी आहे. गेल्या काही दिवसांत देशाच्या वायव्य आणि ईशान्य राज्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे, देशात मान्सूनच्या पावसाची तूट 4 जुलै रोजी केवळ 3% इतकी कमी झाली आहे. 1 जूनपासून सुरू झालेल्या चार महिन्यांच्या पावसाळ्यात आतापर्यंत 196.9 मिमी पावसाच्या तुलनेत 190.6 मिमी पाऊस झाला आहे.

काश्मीरमध्ये उष्णतेची लाट
एकीकडे देशाचा उर्वरित भाग मान्सूनच्या पावसाने भिजत असतानाच दुसरीकडे उन्हाळ्यातही थंड राहणारे काश्मीर खोरे या दिवसांत होरपळत आहे. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, अमरनाथ यात्रा मार्ग, पहिल्यांदाच संपूर्ण खोरी उष्णतेच्या लाटेत सापडली आहे. तापमानाचा पारा सातत्याने 32 अंशांच्या वरच आहे. गेल्या 7 दिवसांपासून पहिल्यांदाच श्रीनगर 35 अंशांपेक्षा जास्त तापमानाचा सामना करत आहे. गुरुवारी ते 35.7 अंश होते. हे सामान्यपेक्षा सुमारे 7 अंश जास्त आहे. यापूर्वी 9 जुलै 1999 रोजी श्रीनगरचे तापमान 37 अंशांवर होते. उष्णतेच्या लाटेमुळे खोऱ्यातील शाळांना 17 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.