राज्यात 79 एमएलडी पाण्याचा तुटवडा

0
10

>>मुख्यमंत्री; नव्या 11 जलशुद्धीकरण प्रकल्पांचे काम सुरू

राज्याला दरदिवशी 664 एमएलडी शुध्दीकरण केलेल्या पाण्याची गरज भासत आहे. राज्य सरकारकडून दरदिवशी 585 एमएलडी पाण्याचे शुध्दीकरण करून त्याचा नागरिकांना पुरवठा केला जात असून, सुमारे 79 एमएलडी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारने नव्या 11 जलशुध्दीकरण प्रकल्पांची कामे सुरू केली असून, तेथे 248.6 एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत आमदार विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा आणि विरेश बोरकर यांच्या एका संयुक्त लक्षवेधी सूचनेवरील उत्तरादाखल दिली.

राज्यातील पाण्याच्या पुरवठ्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले जात आहे. राज्यात पाण्याचा वापर दरवर्षी वाढत चालला आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण प्रकल्पांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गांजे येथे 25 एमएलडी, तुये येथे 30 एमएलडी, शिवोली येथे 5.6 एमएलडी, अस्नोडा येथे 30 एमएलडी, साळावली येथे 100 एमएलडी, कुळे येथे 3 एमएलडी, पिळर्ण येथे 15 एमएलडी, कुडचिरे येथे 10 एमएलडी, मोर्ले येथे 15 एमएलडी, मेणकुरे येथे 10 एमएलडी, गावणे-गावडोंगरी येथे 5 एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्पांची कामे हाती घेतली जात आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तथापि, राज्य सरकारकडून पाणीपुरवठ्याबाबत सारवासारव केली जात आहे, अशी टीका आमदार विजय सरदेसाई यांनी यावेळी केली.

राज्यातील पाणी पुरवठ्याबाबत सत्यस्थिती लपवून ठेवली जात आहे. राज्य सरकारचा ‘हर घर जल’चा दावा दिशाभूल करणारा आहे. राज्यातील काही भागातील नागरिकांना दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातो. काही गावात जलवाहिनी सुध्दा घातलेली नाही, असा दावा आमदार विरेश बोरकर यांनी केला.
पाण्याच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्याची गरज आहे. नागरिकांनी दिवसा किमान चार तास पाणी मिळाले पाहिजे, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. बाणावली मतदारसंघातील एका बालवाडीला पाणी, वीज जोडणी नाही, तसेच शौचालयाची सुविधा नाही, असे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी निदर्शनास आणून दिले.

राज्यभरातील पारंपारिक विहिरी, झरी दुर्लक्षित झाल्याने पाण्याची समस्या गंभीर बनली आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. यावेळी आमदार नीलेश काब्राल, आमदार प्रेमेंद्र शेट व इतरांनी या चर्चेत भाग घेतला.

आता ‘हर घर टँकर’ : फेरेरा
हळदोणा मतदारसंघातील अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या कायम आहे. गिरी येथे वरच्यावर जलवाहिनी फुटते. या प्रकारामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. घरात नळ आहे; पण नळाला पाणी नाही. आता, ‘हर घर टँकर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका आमदार कार्लुस फेरेरा यांनी केली.

बेकायदा बोअरवेलना दंड
राज्यातील पाणी चोरीच्या प्रकाराना आळा घालण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. बेकायदा बोअरवेलवर कारवाई आणखी कडक केली जाणार आहे. बेकायदा बोअरवेल प्रकरणी दंड 10 लाखापर्यंत वाढविला जाणार आहे. नवीन बांधकामांना नळजोडण्या देण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.