>> नवे ६५५ रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या ७०५१
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ९ कोरोना बळींची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यातील कोरोना बळींमध्ये ५२ टक्के कोविड लस न घेतलेल्या जणांचा समावेश आहे. तसेच, नवीन ६५५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १६.७४ टक्के एवढे आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्वॅब चाचण्यांचे प्रमाण घटले असून, गेल्या चोवीस तासांत नवीन ३९१२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ६५५ नमुने बाधित आढळून आले. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ७ हजार ०५१ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३७०८ एवढी झाली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत ४७ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून, बर्या झालेल्या ३८ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे. राज्यातील सुमारे २ लाख ४० हजार ४७१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील २ लाख २९ हजार ७१२ नागरिक बरे झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. मागील चोवीस तासांत आणखी १४६५ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५३ टक्के एवढे आहे.
१५ हजार मुलांना दुसरा डोस
राज्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांना देण्यात येणार्या कोविड लसीच्या दुसर्या डोसला चांगला प्रतिसाद लाभत आहे. १ फेब्रुवारीला ६३६६ मुलांना कोविडचा दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत १५ हजार ९७४ मुलांना दुसरा डोस देण्यात आला आहे. या वयोगटातील ८३.१८ टक्के मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे.
बळींपैकी चार लसीकरणाविना
९ कोरोना बळींपैकी ४ कोरोनाबाधितांनी कोविड लस घेतली नव्हती. तीन बाधितांनी कोविड लस घेतल्याबाबत माहिती उपलब्ध नाही, तर दोघा बाधितांनी कोविड लसीचे दोन डोस घेतले होते, असे अहवालात म्हटले आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात ३ कोरोनाबाधित आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.