राज्यात ८ डिसेंबरपासून आयुर्वेद कॉंग्रेस, आरोग्य एक्स्पो

0
9

>> केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांची माहिती

>> ४५ देशांतील प्रतिनिधींचा सहभाग असणार

गोव्यात येत्या ८ ते ११ डिसेंबर दरम्यान ९ वे जागतिक आयुर्वेद कॉंग्रेस आणि आरोग्य एक्स्पो होणार आहे. ‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ हा या वर्षीच्या आयुर्वेद कॉंग्रेसचा मुख्य विषय आहे, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेजा, एआयआयए दिल्लीच्या संचालक प्रा. डॉ. तनुजा नेसरी, डॉ. पी. एम. वारियर व इतरांची उपस्थिती होती.
जागतिक पातळीवर आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आणि आयुर्वेदाकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी आयुर्वेद कॉंग्रेसचे आयोजन केले जात आहे. आधुनिक चिकित्सा पद्धतीला अनुसरून नवीन सुलभ आणि स्वस्त स्वास्थ्य प्रणाली तयार करण्याचा यामागील उद्देश आहे, असेही सोनोवाल यांनी सांगितले.
आयुर्वेद उपचार पद्धती केवळ मनुष्याच्या स्वास्थ्याची काळजी घेत नाही, तर आपल्या पर्यावरणाची सुध्दा काळजी घेते. पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे. परमेश्वराने स्वच्छ प्राणवायू देण्यासाठी झाडे निर्माण केली. या झाडांचे संवर्धन करण्याची गरज आहे, असे सोनोवाल म्हणाले.

या व्यतिरिक्त राष्ट्रीय औषधी मंडळाकडून औषधी वनस्पती या विषयावर एक चर्चासत्र घेतले जाणार आहे. पशु आयुर्वेद, नृवंशविज्ञान आणि पारंपरिक औषध व्यावसायिक यांची बैठक घेतली जाणार आहे. तसेच गुरू शिष्य संमेलन, प्राध्यापक संमेलन, आयुर्वेद आणि ज्योतिष विज्ञान, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सभा, आयुर्वेद आणि माध्यमे, आयुर्वेदावर लघुपट महोत्सव आदींचेही आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य एक्स्पोमध्ये आयुष उपचार पद्धतीमधील प्रगतीच्या माहितीचे प्रदर्शन केले जाणार आहे. या एक्स्पोमध्ये ३०० स्टॉल्ससाठी कंपन्यांनी नोंदणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांनी आयुर्वेद ही आपली जीवन पद्धती बनविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. नागरिक आधुनिक काळात आयुर्वेदाकडे वळू लागले आहेत, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

राज्यात ऍलोपॅथीबरोबरच आयुर्वेद, योग यांच्या प्रसारासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

हर घर तिरंगाच्या धर्तीवर आयुर्वेद दिवसानिमित्त दि. २३ ऑक्टोबर रोजी ‘हर घर आयुर्वेद’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमातून नागरिकांमध्ये आयुर्वेदाबाबत जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. तनुजा नेसरी यांनी दिली.

४५०० प्रतिनिधी सहभागी होणार
केंद्र, राज्य आणि केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्यातून आयोजित चार दिवसीय आयुर्वेद कॉंग्रेसमध्ये जगातील विविध आयुर्वेद उद्योग कंपन्या, आयुर्वेदिक डॉक्टर, पारंपरिक आयुर्वेदिक डॉक्टर, आयुर्वेदाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, औषध निर्माते आदी सहभागी होणार आहेत. त्यात सुमारे ४५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ४५ देशांतील ४५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या आयुर्वेद कॉंग्रेसमध्ये १६ विषयांवर सत्रे होणार आहेत. त्यात आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक सहभागी होतील, अशी माहिती सर्बानंद सोनोवाल यांनी दिली.