>> फोंड्यातून प्रारंभ, साखळीत २७ रोजी समाप्ती
गोव्यातील सर्वात मोठा धार्मिक हिंदू उत्सव १४ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे १४ पासून पुढे पंधरा दिवस तो गोव्याच्या विविध भागात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जाणार आहे. चित्ररथ मिरवणूक १४ रोजी फोंडा येथून सुरू होणार आहे. पणजीमध्ये १८ रोजी या दिवशी चित्ररथ मिरवणूक आयोजित करण्यात आली असून पेडणे आणि साखळी गावात २७ रोजी चित्ररथ मिरवणूक निघून त्या दिवशी शिगमोत्सवाची सांगता होईल.
यावर्षी राजधानी शहरातील चित्ररथ मिरवणूक वेळेवर सुरू करण्यासाठी खास तयारी करण्यात येत आहे. यंदा दुपारी साडेचार वाजताच मिरवणूक सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, ज्यामुळे मध्यरात्रीपर्यंत चित्ररथ मिरवणूक सुरू राहून वाहतुकीची समस्या जाणवणार आहे.
दोन चित्ररथांमध्ये जास्त अंतर पडल्यास त्याचाही विचार करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. दोन चित्ररथ किंवा नृत्य समूहामधील अंतर २० मीटर्सपेक्षा जास्त असता कामा नये असा प्रस्तावही देण्यात आला आहे. सर्व शिगमो मिरवणूक समितींना आपापल्या परिसरातील शिगमो परेड मार्गावर जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिसांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिगमो उत्सव पाहाण्यासाठी हजारो पर्यटक राज्यात दाखल होतील असा अंदाज आहे.
शिगमो चित्ररथ मिरवणूक
वेळापत्रक पुढीलप्रमाणे
शहर तारीख : फोंडा – १४ मार्च वास्को- १५ मार्च वाळपई- १६ मार्च डिचोली- १७ मार्च पणजी – १८ मार्च मडगाव- १९ मार्च कुडचडे- २० मार्च धारबांदोडा- २१ मार्च केपे- २२ मार्च कुंकळ्ळी- २३ मार्च सांगे आणि शिरोडा- २४ मार्च काणकोण आणि थिवी- २५ मार्च म्हापसा- २६ मार्च पेडणे आणि साखळी- २७ मार्च.