>> मुख्यमंत्री सावंत ः तीन दिवसांच्या सर्वेक्षणास सहकार्याचे नागरिकांना आवाहन
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या १३ ते १५ एप्रिल २०२० दरम्यान तीन दिवस घरोघरी जाऊन सामाजिक आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या आरोग्य सर्वेक्षणाच्या वेळी नागरिकांनी सर्वेक्षण करण्यासाठी येणार्या सरकारी पथकाला कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याबाबत योग्य माहिती देऊन राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत काल केले.
या आरोग्य सर्वेक्षणाच्या कामासाठी सात हजार कर्मचार्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. शिक्षण खात्याचे कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, बीएलओ आदी सहभाग घेणार आहे. या सर्वेक्षणाबाबत मार्गदर्शन शिबिरे मंगळवारपासून घेतली जाणार आहेत. आरोग्य सर्वेक्षणासाठी घरी येणारे सरकारी पथक एका फॉर्मच्या माध्यमातून माहितीचे संकलन करणार आहे. कुटुंबातील व्यक्तींना सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पथकाला माहिती द्यावी, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
फोंडा, मडगाव, म्हापशात
संशयितांच्या चाचणीची सोय
राज्यात कोरोना संशयित व्यक्तीची जलद गतीने चाचणी करण्यासाठी अतिरिक्त चाचणी यंत्रे, चाचणी कीटची खरेदी करण्यात आली आहे. फोंडा, मडगाव, म्हापसा येथे कोरोना संशयितांची चाचणीची सोय करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कोविड वॉर्डात काम
करणार्यांना जादा पगार
कोविड हॉस्पिटलमध्ये, जीएमसीच्या कोविड वॉर्डात सेवा बजावणार्या सर्व कर्मचार्यांना २० टक्के अतिरिक्त पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड हॉस्पिटलमधील कर्मचार्यांना मिळणार्या सर्व सुविधा गोमेकॉतील कोविड वॉर्डात काम करणार्या कर्मचार्यांना मिळणार आहेत. कोविड हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी घरी जात नाहीत. त्यांच्या निवासाची सोय हॉटेलमध्ये करण्यात आलेली आहे. गोमेकॉमधील खास वॉर्डातील कर्मचार्यांना ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. कोविंड १९ साठी कार्य करणारे रुग्णवाहिकेवरील कर्मचारी, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार या सर्वांना आवश्यक सुविधांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पर्वरीतील प्रयोगशाळेला
चाचणीस मान्यता
पर्वरी येथील एसएलआर या प्रयोगशाळेला कोविड १९ चाचणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत नागरिक आपली खासगीरित्या तपासणी करून घेऊ शकतात. ही प्रयोगशाळा तपासणी अहवालाची माहिती दडवून ठेवू शकत नाही. तपासणी करण्यात येणार्या सर्व नमुन्यांचाबाबत माहिती अहवाल देणे बंधनकारक आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कर्मचार्यांना विमा कवच
कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी फ्रंटलाईनवर काम करणार्या कर्मचार्यांना विमा कवच उपलब्ध केले जात आहे. यात हॉस्पिटलमधील सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचाही समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.
विदेशातील गोमंतकीय खलाशांना
आणण्यावर लवकरच निर्णय
परदेशात बोटीवर असलेल्या खलाशांना आणण्याबाबत केंद्रीय पातळीवर बोलणी सुरू आहे. खलाशांना आणण्याबाबत मंगळवारपर्यत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या १४ पर्यत लॉकडाऊन कडक पाळण्याची गरज आहे. १४ एप्रिलनंतर केंद्र आणि राज्य सरकार विचार विनिमिय करून पुढील निर्णय घेणार आहे. १४ नंतर पुढे काय करायचे याबाबत मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊन येत्या ११ किंवा १२ एप्रिलपर्यत केंद्राला सूचना पाठविण्यात येणार आहेे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.