राज्यात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण

0
23

>> आरोग्य खात्याचा दावा; राज्यातील खास लसीकरण केंद्रे बंद; आता आरोग्य केंद्रांवर आठवड्यातून एकदाच मिळणार लस

राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या दोन्ही डोसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे राज्यातील खास लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली असून, आरोग्य खात्याच्या लसीकरण कार्यक्रमात कोविड प्रतिबंधक लसीचा समाविष्ट करण्यात आला आहे. आता राज्यातील आरोग्य केंद्रांवर आठवड्यातून एक दिवस लस उपलब्ध असणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या संचालिका आयरा आल्मेदा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला होता. त्यानंतर एक वर्ष आणि एक महिन्याच्या कालावधीत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. कोविडच्या दुसर्‍या डोसचे १०० टक्के उद्दिष्ट काल पूर्ण झाले आहे. राज्यात १००.०५८ टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे, तर कोविड लसीचा पहिला डोस १११.७४ टक्के नागरिकांनी घेतला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने लसीकरणासाठी ११ लाख ६६ हजार नागरिकांचे उद्दिष्ट दिले होते, असेही आल्मेदा यांनी सांगितले.

राज्यातील १५ ते १८ वयोगटातील ८७.५१ टक्के मुलांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला असून, सुमारे ६५ टक्के मुलांना कोविड लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यातील काही शालेय मुले बाधित झाल्याने त्यांना दुसरा डोस देण्यात आलेला नाही. त्यांना ९० दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती राज्य लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.

अनेक जण लसीविना; तरीही…
राज्याच्या आरोग्य खात्याने १०० टक्के लसीकरणाचा दावा केलेला असला तरी अजूनही अनेक जणांनी लस घेतलेली नाही. कोविडच्या तिसर्‍या लाटेत गेल्या अनेक महिन्यांत शेकडो जणांचे बळी गेले, त्यातील निम्म्या लोकांनी लस घेतली नव्हती, ही बाब आरोग्य खात्याच्या आकडेवारीतून समोर आली होती. तसेच सध्याच्या घडीला सुद्धा दिवसाला जेवढे बळी जात आहेत, त्यापैकी निम्म्यांनी लस घेतल्याचे समोर येत आहे. त्यामुळे १०० टक्के लसीकरणाच्या दाव्यात किती तथ्य आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कोविड प्रतिबंधक लसीचे डोस वाया जाऊ नये म्हणून आठवड्यातून एक दिवस लसीकरणासाठी ठेवण्यात आला आहे. आरोग्य खात्याला केंद्र सरकारकडून दिलेल्या उद्दिष्टानुसार १०० टक्के लसीकरण झाले आहे. तथापि, राज्यातील काही नागरिकांनी अजूनपर्यंत कोविड लसीचा डोस न घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ. राजेंद्र बोरकर,
प्रमुख, राज्य लसीकरण मोहीम.

५ कोरोना बळींसह
राज्यात नवे ११८ रुग्ण

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ५ कोरोना बळींची नोंद झाली असून, नवीन ११८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४.३३ टक्के एवढे आहे.

गेल्या चोवीस तासांत कोविड स्वॅबच्या चाचण्यांमध्ये घट झाली असून, २७२५ स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यातील ११८ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय रुग्णसंख्या १ हजार ६०८ एवढी झाली आहे.

राज्यातील पाच बळींपैकी २ जणांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले होते. एकाने लसीचा एक डोस घेतला होता, तर दोघांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नाही, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली. या पाच बळींसह राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३७८२ एवढी झाली आहे.

२५९ जण कोरोनामुक्त
राज्यात मागील चोवीस तासांत आणखी २५९ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७९ टक्के एवढे आहे.

७ जण इस्पितळांत
राज्यात गेल्या चोवीस तासांत ७ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले आहे. इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोनाबाधिताची संख्या कमी होत आहे. इस्पितळातून बर्‍या झालेल्या ६ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.