राज्यात ‘स्वाईन फ्लू’च्या तिसर्‍या बळीने खळबळ

0
139

राज्यात स्वाईन फ्लूचे दोन बळी जाऊनही आरोग्य खाते या साथीवर पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा करीत असले तरी काल या रोगाने बेतूल येथील एका महिलेचा बळी घेतल्याने खळबळ माजली आहे.
काल दिवसभरात स्वाईन फ्लूची लागण झालेले ६ रुग्ण आढळले असून आतापर्यंत या रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३० वर पोचली आहे. हा अधिकृत आकडा असला तरी काही संशयित रुग्ण खासगी इस्पितळांमध्ये उपचार घेत असल्याने संशयित रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.यापूर्वी या रोगाची लागण झालेले दोन रुग्ण मरण पावले आहेत. पैकी पहिल्यांदा बळी पडलेली व्यक्ती विदेशातून आली होती. या रोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करण्यासाठी मडगावच्या हॉस्पिसिओ, चिखली-वास्को, आयडी इस्पितळ फोंडा, जिल्हा इस्पितळ म्हापसा आणि बांबोळी येथील गोमेकॉतही औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. या रोगाची बाधा असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी वेगळी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
दरम्यान, स्वाईन फ्लू जेथे पसरला आहे तेथे प्रवास करून गोव्यात आलेल्या लोकांनाच त्याची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे.

‘स्वाईन फ्लू’वर आयुर्वेदात उपचार
‘स्वाईन फ्लू’ सारख्या रोगावरही आयुर्वेदात उपचार असल्याचे आरोग्य भारतीचे डॉ. आदित्य बर्वे यांनी सांगितले. आयुर्वेद शास्त्र जंतूचा विचार करीत नाही. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्याचाच विषय असतो, असे सांगून स्वाईन फ्लू थंड हवामानात अधिक फैलावतो. गरमीच्या काळात तो नष्ट होतो, असे ते म्हणाले.
हल्लीच्या काळात संसर्गजन्य रोग नियंत्रणाखाली आले आहेत. परंतु बदलत्या जीवन शैलीमुळे होणारे रोग वाढले आहेत. त्यावर आयुर्वेद हा चांगला उपचार असल्याचे डॉ. बर्वे म्हणाले. प्रत्येकाने निसर्गाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. संजीवनी हे पुराणांतील वनस्पतीचे नाव आहे. आयुर्वेदात संजीवनी नाही, असेही डॉ. बर्वे यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. संजीवनी वनस्पतीचा कुठेही पुरावा नाही, असे ते म्हणाले. तृतीय पंथियांवर आयुर्वेदातच नव्हे तर अन्य कोणत्याही उपचार पध्दतीत औषध नाही. तो नैसर्गिक विषय असल्याचे डॉ. क्षीप्रा लवंदे यांनी सांगितले.