राज्यात सरासरीहून २१ टक्के अधिक पावसाची झाली नोंद

0
138

मागील चार वर्षे सलग तुटीचा मोसमी पाऊस पडल्यानंतर यंदा केवळ ८६ दिवसात सरासरीपेक्षा २१ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत १२३.६२ इंच पावसाची नोंद झाली असून मोसमी पावसाचे आणखी ३६ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यंदा मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार गोव्यात सरासरी पावसाचे प्रमाण साधारण ११७ इंच एवढे धरले जात आहे. राज्यात मागील चार वर्षाच्या तुटीच्या मोसमी पावसाची परंपरा यंदा खंडीत झाली आहे. यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये १२०.५८ इंच पावसाची नोंद झाली. या वर्षी सरासरी पेक्षा साधारण ३ टक्के जादा मोसमी पावसाची नोंद झाली होती.
वर्ष २०१५ मध्ये २० टक्के कमी पावसाची (९४.०३ इंच) नोंद झाली. वर्ष २०१६ मध्ये मोसमी पाऊस सरासरी पावसाच्या जवळ जाऊन ठेपला होता. त्या वर्षी १ टक्के कमी पावसाची (११६.४४ इंच) नोंद झाली. वर्ष २०१७ मध्ये मोसमी पावसाने इंचाचे केवळ शतक (१००.५९ इंच) पूर्ण केले होते. तर, वर्षे २०१८ मध्ये मोसमी पाऊस इंचाच्या शतकाच्या जवळ सुध्दा पोहोचू शकला नाही. मोसमी पावसाचे प्रमाण १९ टक्के कमी होते. केवळ ९४.९० इंच पावसाची नोंद झाली होती.

राज्यात यंदाही मोसमी पावसाचे उशिराने आगमन झाले. त्यामुळे पावसाच्या सरासरी प्रमाणाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण केला जात होता. यंदाही तुटीचा मोसमी पावसाची शक्यता वर्तविली जात होती. तथापि, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात कोसळलेल्या जारदोर पावसामुळे पावसाचे सरासरी प्रमाण भरून आले आहे. राज्यात जोरदार पावसामुळे विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे केवळ शेती, बागायतीचे साधारण ९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे घरांची पडझड, वीज खात्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राज्यातील सर्वच भागात जोरदार पावसाची नोंद झालेली आहे. वाळपई तालुक्यात मोसमी पावसाने इंचाचे दीड शतक ओलांडले आहे. सांगे येथे १४३ इंच, साखळी येथे १३६ इंच, केपे येथे १३० इंच, ओल्ड गोवा येथे १२७ इंच, ओल्ड गोवा येथे १२७ इंच, पेडणे येथे १२५ इंच पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत सर्वांत कमी पावसाची नोंद मुरगाव येथे १०१.३३ इंच एवढी झाली आहे.