राज्यात शुक्रवारी गुंजणार संपूर्ण वंदे मातरम्‌‍

0
2

>> एकाच दिवशी एकाच वेळी सकाळी 10 वा. गायन विवेकानंद केंद्र कन्याकुमारी गोवा शाखेतर्फे आयोजन

वंदे मातरम्‌‍ या गीताला राष्ट्रगानाचा दर्जा प्राप्त होऊन शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विवेकानंद केंद्र कन्याकुमारी गोवा शाखेच्या प्रयत्नातून संपूर्ण गोव्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयात सकाळी 10 वाजता एकाच वेळी संपूर्ण वंदे मातरम्‌‍ गीत गायिले जाणार आहे. या सामूहिक शक्ती प्रकट होणाऱ्या कार्यक्रमात गोव्यातील सर्व शिक्षण संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वंदे मातरम सार्धशती समितीचे अध्यक्ष केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक व कार्यवाह वल्लभ केळकर यांनी केले आहे.

यासाठी सर्व शाळांनी सकाळी 10 वाजता विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे व सुरुवातीला भारत माता पूजन करून थोडक्यात या विषयाची माहिती सर्व विद्यार्थ्यांना द्यावी असे मंत्री श्री. नाईक व श्री. केळकर यांनी आवाहन केल आहे.

शिक्षण खात्याने पाठवलेल्या पत्रात दिलेला गुगल फॉर्म सर्वांनी भरावा व त्यात सहभागी होणाऱ्या सर्व मुलांची व शिक्षकांची संख्या कळवावी. याबाबत काही समस्या असतील तर सर्व शाळा प्रमुखांनी तालुका समन्वयकाकडे संपर्क साधावा असेही आयोजकांतर्फे कळवण्यात आले आहे.

समन्वयक
यासाठी तालुका समन्वयक नेमण्यात आले आहेत. त्यात बार्देश तालुका पल्लवी मांद्रेकर (9359657733), पेडणे तालुका प्रतिभा चुरी (9284268583), तिसवाडी तालुका श्रुती बगळी ( 9145017507), डिचोली तालुका रुपाली डोईफोडे (8275147144), सत्तरी तालकुा क्षमा मराठे (8275644503), फोंडा तालुका (प्रजय वझे 7507492448), सांगे व धारबांदोडा तालुका अनामिका वरक (7507056314), काणकोण तालुका वैभवी काणकोणकर (7517580588), सासष्टी तालुका पूजा वझे (7499124152), मुरगाव तालुका करुणा म्हावळिंगकर (9022494714) यांचा समावेश आहे.

या संदर्भात प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात आयोजकांनी, राष्ट्राची एकता दृढ करण्याचे सामर्थ्य वंदे मातरम या महामंत्रात आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून ‘वंदे मातरम्‌‍’ हे गीत 7 नोव्हेंबर 1875 मध्ये अवतरले. यंदा या गीताची 150 वी जयंती साजरी केली जात आहे.
या निमित्ताने एकाच दिवशी, एकाच वेळी गोव्यातील सर्व शाळा व महाविद्यालयात सम्ंपूर्ण ‘वंदे मातरम्‌‍’ होणार आहे आणि तो मोठा विक्रम गोव्याच्या इतिहासात होणार आहे. शालेय संस्था सोडून इतरांनीसुद्धा आपल्या कार्यस्थानी वंदे मातरम्‌‍ गावे व ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वर्षभर विविध कार्यक्रम
या कार्यक्रमानंतर समितीच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम उपक्रम केले जाणार आहेत. वंदे मातरम्‌‍ गायन स्पर्धा, वंदे मातरम वर नृत्य सादरीकरण, प्रश्नमंजुषा, प्रदर्शनी चर्चासत्र, देखावे, अभिवाचन कार्यक्रम, व्याख्याने, प्रभात फेरी रांगोळी, चित्रकला स्पर्धा अशा कार्यक्रमांचा समावेश असल्याचे आयोजकांनी पत्रकात म्हटले आहे.