राज्यात शीतगृहांची सुविधा उपलब्ध करणार

0
6

>> मुख्यमंत्र्यांकडून मानस व्यक्त; कृषी विकासासाठी राज्य सहकारी बँकेकडून सहकार्याची अपेक्षा

राज्यात फलोत्पादनाला (हॉर्टिकल्चर) चालना देण्यासाठी शीतगृहाची सुविधा उपलब्ध करण्यावर विचार सुरू आहे. राज्यातील शिखर बँक असलेल्या गोवा राज्य सहकारी बँकेने केवळ आर्थिक व्यवहारावर अवलंबून न राहता राज्यात फलोत्पादन, कृषी, मच्छिमारी, दुग्धोत्पादन आदी सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केली. गोवा राज्य सहकारी बँकेच्या 60 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात पाटो-पणजी येथे ते बोलत होते.

गोवा राज्य भाजीपाला, दूध, पोल्ट्री आदींसाठी परराज्यावर अवलंबून आहे. भाजी, दूध, पोल्ट्री आदींच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी वाव आहे. गोव्यात शीतगृहाची सुविधा उपलब्ध झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांचा भाजीपाला साठवून त्याचा गरजेनुसार पुरवठा करणे शक्य होणार आहे. राज्यात शीतगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादित केलेला माल साठवून ठेवण्यास अडचणी येतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात पोल्ट्री व्यवसायाला भरपूर वाव आहे. राज्यात केवळ 2 टक्के पोल्ट्री उत्पादन होत आहे. 98 टक्के पोल्ट्री उत्पादन परराज्यातून येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सहकारी पतसंस्था, अर्बन बँकांमध्ये ठेवीदार विश्वासाने गुंतवणूक करतात. त्यामुळे ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाईल अशा प्रकारची कोणतीही कृती व्यवस्थापनाने करू नये. राज्यातील काही पतसंस्थांनी ठेवीदारांनी विश्वासाने केलेली गुंतवणूक बुडविली आहे. राज्य सरकारकडून गैरप्रकार टाळण्यासाठी वेळोवेळी सहकार कायद्यात बदल केले जातात. त्याचबरोबर पतसंस्था, सहकारी बँकांनी कामकाज करताना सावधगिरी बाळगावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील शिखर बँकेने अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास सरकारच्या काही योजना बँकेच्या सहकार्याने राबविण्यावर विचार केला जाणार आहे. स्वयंपूर्ण गोव्यासाठी राज्य सहकारी बँकेची भूमिका महत्त्वाची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

गोवा राज्य सहकारी बँक बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्य सरकारने आवश्यक सहकार्य केल्याने बँकेची स्थिती आता सुधारली आहे. बँकेने अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्यातील पतसंस्था, अर्बन बँका यांना एका छताखाली आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. एखादा व्यक्ती अनेक पतसंस्थांतून कर्ज घेऊन सर्वांना आर्थिक संकटात टाकण्याचे काम करीत असतो. सर्व पतसंस्था एकाच छत्राखाली असल्यास असे फसवणुकीचे प्रकार टाळले जाऊ शकतात, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. यावेळी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई व इतरांची उपस्थिती होती.