राज्यात वस्त्रोद्योगाला जमीन देण्याची प्रक्रिया : उद्योगमंत्री

0
78

पाच हजार नोकर्‍यांची निर्मिती शक्य
राज्य सरकार एका निर्यातीभिमुख वस्त्रोद्योगनिर्मिती कंपनीला गोव्यात जमीन देण्याच्या प्रक्रियेत असून त्याद्वारे सुमारे ५ हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी काल सांगितले.
अलीकडेच नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी आयोजिलेल्या या उद्योगाविषयक परिषदेत मंत्री नाईक सहभागी झाले होते. वस्त्रोद्योग उद्योगासाठी प्रशिक्षित व कुशल कामगारांची आवश्यकता असल्याने गोवा सरकारने येथील युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी गोव्यात १२० प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली असल्याची माहिती त्यांनी दिली. या केंद्रांद्वारे दरवर्षी सुमारे ५,१३६ युवकांना शिवण, भरतकाम यांचे प्रशिक्षण देण्याचा सरकारचा विचार असल्याचे नाईक म्हणाले. वस्त्रोद्योग हा गोव्यासारख्या पर्यटन राज्याला योग्य आहे. कारण प्रदूषण न करणारा उद्योग असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात निर्यातीसाठी चांगल्या दर्जाचे बंदर असल्याने त्याचा लाभही या उद्योगाला होणार असल्याचे ते म्हणाले.