>> कोविडविषयक निर्बंध देखील शिथिल करण्याचे सूतोवाच
राज्यात कोरोनाचा संसर्ग आता बराच कमी झाला असून, कोरोनाविषयक नियम व निर्बंध हटवण्याबाबत राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात कोविडविषयक निर्बंध शिथिल केले जाणार असून, मास्क सक्ती देखील मागे घेतली जाणार आहे. जिल्हाधिकार्यांकडून यासंबंधी आदेश लवकरच जारी केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
देशात कोविड महामारीचा फैलाव झाल्यानंतर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात मास्क हे महत्त्वाचे साधन ठरले होते. मास्कच्या वापरामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बर्याच प्रमाणात यश आले होते. आता राज्यात कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने मास्क सक्ती मागे घेण्याबाबत संकेत दिले आहेत.
राज्यात मास्कची सक्ती मागे घेतली जाणार आहे. देशात कोविड रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने महाराष्ट्र, नवी दिल्ली, तेलंगणा आदी राज्यात कोविड-१९ निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर गोव्यात सुध्दा कोविड-१९ निर्बंध शिथिल करणारा आदेश जिल्हाधिकार्यांकडून जारी केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
नव्या तीन कोरोनाबाधितांची नोंद
राज्यात मागील चोवीस तासांत नवीन ३ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ४१ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ७८४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यात मागील चोवीस तासांत ५ जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४२ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८३२ एवढी आहे.
देशात संसर्गजन्य ‘एक्सई’चा शिरकाव
>> मुंबईत आढळला पहिला रुग्ण; चिंतेत भर
कोरोनाच्या नवा प्रकार ‘एक्सई’बाबत जागतिक आरोग्य संघटनेने आधीच सतर्क केले असताना भारतात या प्रकाराचा पहिला रुग्ण आढळला आहे. मुंबईत ‘एक्सई’ आणि ‘कप्पा’ प्रकाराचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या वृत्ताने मुंबईसह देशाचीही चिंता वाढली आहे.
दक्षिण आफ्रिकेहून भारतात आलेल्या एका ५० वर्षीय महिलेला एक्सई प्रकाराची लागण झाली होती. २७ फेब्रुवारीला तिला लागण झाली होती. त्यानंतर ती कोरोनामुक्त झाली होती. त्यानंतर कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण (जिनोम सिक्वेंसिंग) अंतर्गत अकराव्या चाचणीमध्ये दोन नव्या प्रकारांचे रुग्ण आढळले. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी ३७६ नमुने घेण्यात आले होते, त्यातील २३० नमुने मुंबईतून घेतले गेले होते. या चाचणीची ही अकरावी खेप होती. त्यात २३० पैकी २२८ नमुन्यांत ओमिक्रॉनची लक्षणे, एकात कप्पाची लक्षणे, तर एकात एक्सईची लक्षणे असल्याचे स्पष्ट झाले.
कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरली असतानाच भारतात नव्या प्रकारांनी शिरकाव केल्याने डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे. मुंबईत एक्सई आणि कप्पा प्रकाराचा एकेक रुग्ण आढळला आहे. देशातील एक्सईचा हा पहिलाच रुग्ण ठरला आहे. जीनोम सिक्वेन्सिंग केले असता हे रुग्ण आढळले आहेत.
कोविड विषाणू उपप्रकारानुसार
२३० बाधित रुग्णांचे वर्गीकरण
- ओमिक्रॉन – २२८ रुग्ण (९९.१३ टक्के)
- कप्पा प्रकार – १ रुग्ण (०.४३ टक्के)
- एक्सई प्रकार – १ रुग्ण (०.४३ टक्के)