राज्यात यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त

0
24

>> हवामान विभागाचा अंदाज; मान्सूनच्या वाटचालीवर ‘रेमल’चा परिणाम नाही

राज्यात यावर्षी नैऋत्य मान्सून सरासरी पेक्षा जास्त पडण्याची शक्यता येथील हवामान विभागाने काल वर्तविली. 31 मे रोजी नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच बंगालच्या उपसागरातील रेमल चक्रीवादळाचा मान्सूनच्या वाटचालीवर कोणताही परिणाम झालेला नाही. राज्यात नियोजित वेळेनुसार मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने 2024 च्या नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामाबाबतच्या दीर्घकालीन अंदाजामध्ये सुधारणा केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस देशभरात सरासरीच्या 106 टक्के राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी देशभरात पाऊस बहुधा सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात 2023 मध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. 2023 मध्ये एकूण 132.09 इंच पावसाची नोंद झाली. पावसाचे प्रमाण सुमारे 11 टक्के जास्त होते, तर 2022 मध्ये सुमारे 10 टक्के कमी पावसाची नोंद झाली होती. 2022 मध्ये 107 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात 2020 मध्ये सुमारे 165.47 इंच आणि 2021 मध्ये 124.25 इंच पावसाची नोंद झाली होती.

राज्यात मंगळवारी पणजीत कमाल तापमान 33.9 अंश सेल्सिअस नोंद झाले. राज्यात आगामी सात दिवस कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात चोवीस तासांत किरकोळ पावसाची नोंद झाली आहे. आगामी सहा दिवसांसाठी पावसाबाबत कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. पणजीमध्ये कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस आणि मुरगाव येथे 33.7 अंश सेल्सिअस नोंद झाले.