राज्यात मूत्रपिंडविकार रुग्णांची वाढती संख्या धडकी भरवणारी!

0
10

मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त; बाराही तालुक्यांतील डायलिसिस केंद्रे पडताहेत अपुरी

राज्यात मूत्रपिंडविकार रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. आपण जनतेला सदैव ‘भिवपाची गरज ना’ असे सांगत असतो; मात्र ज्या वेगाने राज्यात मूत्रपिंड रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, ती धडकी भरण्यासारखी आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली.

सध्या राज्यातील बाराही तालुक्यांत मूत्रपिंडविकार रुग्णांसाठीची डायलिसिस केंद्रे आहेत; पण तरीही ती अपुरी पडू लागली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 20 ते 25 वर्षांपूर्वी राज्यात केवळ गोवा वैद्यकीय महाविद्यालयात डायलिसिस केंद्र होते. त्यावेळी मूत्रपिंड रुग्णांची संख्याही कमी होती; मात्र गेल्या काही वर्षांत ह्या रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढू लागली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मारियो सिक्वेरा यांनी लिहिलेल्या ‘रोड मॅप टू लाँजिटीव्हीटी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

लोकांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. काय खावे, किती खावे, कधी खावे याची आपल्याला माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगून समतोल व सकस असा आहार घ्यावा. त्याशिवाय योग, प्राणायाम आदी हलका व्यायाम करावा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
हल्लीच आपण स्वायंत्र्यसेनानी लिबिया लोबो सरदेसाई यांची भेट घेतल्याचे सांगून त्यांनी वयाची शंभरी पार केली आहे. त्यांनी आरोग्य सांभाळल्यानेच त्या आयुष्याचे शतक पूर्ण करू शकल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दीर्घ व निरोगी आयुष्य असणे ही चांगली बाब असून आपणाला शंभर वर्षे जगण्याची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. योगाद्वारे दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते, असेही ते म्हणाले.