राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळल्या

0
13

राजधानी पणजीत जनजीवन विस्कळीत

मान्सूनपूर्व सरींनी काल रविवारी संध्याकाळी पेडण्यापासून काणकोणपर्यंत आपली हजेरी लावली. राजधानी पणजीतही ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे विविध भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. राजधानी पणजीत बरसलेल्या जोरदार पावसामुळे ज्या ठिकाणी पणजी स्मार्ट सिटीचे काम चालू आहे तेथील परिसर चिखलमय झाला.

हवामान खात्याने काल रविवारी संध्याकाळी पेडणे, डिचोली, बार्देश, तिसवाडी, सत्तरी, फोंडा, धारबांदोडा, सांगें, केपे व काणकोण या तालुक्यात पावसाची शक्यता व्यक्त केली होती. ह्या तालुक्यांतील विविध भागांत हलक्या, मध्यम व जोरदार अशा पावसाच्या सरी काल कोसळल्या.
राजधानी पणजीप्रमाणेच उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यात तसेच साखळी परिसरातही जोरदार पाऊस पडला. तसेच म्हापसा शहरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
हवामान खात्याने रविवारी राज्यातील काही भागांत गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसेच ताशी 30 ते 40 कि. मी. एवढ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली होती. दरम्यान, उद्या मंगळवारपर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.