राज्यात मराठीला दुय्यम स्थान नाही ः मुख्यमंत्री

0
0

>> मराठीच्या जडणघडणीला सरकारचे सर्व सहकार्य

>> साखळीत मराठी राजभाषा संमेलनाचे उद्घाटन

1997 पासून मी मराठी भाषेच्या लढ्यात सहभागी झालेलो असून आता मुख्यमंत्री झालो असलो तरी माझे मराठी प्रेम तितकेच आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा नसला तरी कोणत्याही प्रकारचे दुय्यम स्थान दिले गेलेले नाही. राज्यात कोकणीबरोबरच मराठीला समान न्याय सर्व पातळीवर देण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा किंतु न बाळगता मराठीच्या जडणघडणीसाठी सर्व ते सहकार्य सरकारकडून दिले जात आहे. युवा पिढीला अधिक सक्षम करण्यासाठी अशा प्रकारची संमेलने गरजेची असून त्यासाठी सरकार सर्व सहकार्य देण्यास तयार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.

गोमंतक मराठी अकादमी व मराठी असे आमुची मायबोली आयोजित साखळी येथील राधाकृष्ण मंदिर सभागृहात रविवारी एकदिवसीय दुसऱ्या मराठी राजभाषा साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष राजेंद्र केरकर, कार्याध्यक्ष ॲड. यशवंत गावस, स्वागताध्यक्ष अशोक घाडी, प्रमुख कार्यवाह उदय ताम्हणकर, माजी आमदार नरेश सावळ, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, मराठी असे आमुची मायबोलीचे प्रमुख प्रकाश य. भगत, गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष मधू घोडकिरेकर आदी उपस्थित होते.
मी मुख्यमंत्री होण्याअगोदर काय झाले ते झाले, यापुढे मराठीला पूर्ण सहकार्य लाभेल. सर्वजण मराठीची सेवा करीत असून जगात मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मराठी ही तशी एकप्रकारे जागतिक भाषाच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युवा पिढीला मराठीचे बाळकडू देताना प्राथमिक स्तरावर स्थानिक भाषांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, स्थानिक भाषांना प्रोत्साहन देताना मराठीला अभिजात दर्जा दिला असल्याचे पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत मराठीवर अन्याय केलेला नाही व तो यापुढेही होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मराठी शाळा सरकारने
बंद केल्या नाहीत

राज्यातील मराठी शाळा बंद होत असल्याचा ठपका सरकारवर ठेवला जातो. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. आज पालकांचा ओढा इंग्रजीकडे वाढल्याने मराठीत विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे इंग्रजीच्या अवास्तव स्तोमामुळे प्रत्यक्षात मराठी व कोकणीही मुलांना येत नाही अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. इंग्रजी जरूर शिकावी. तसेच इतर भाषांचे ज्ञान सर्वांना असावे परंतु मातृभाषा यायलाच हवी. कोणत्याच प्राथमिक शाळेवर आम्ही अन्याय केलेला नाही. इंग्रजी शाळांना आम्ही अजिबात अनुदान दिले नाही. प्राथमिक शाळा मजबूत करण्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सरकारमान्य मराठी अकादमी तसेच कोकणी अकादमी कार्यरत आहे. त्यासाठी सरकार सर्व कार्यक्रमांना अनुदान देत असते. पूर्वीच्या मराठी अकादमीला कार्यक्रमासाठी सरकार सर्व ते सहकार्य करेल. तुम्ही कार्यक्रमांचे निवेदन द्या. अशेी हमी यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली व कोकणी आणि मराठी हातात हात घालून नांदत असून कोणत्याही प्रकारचा भाषिक वाद करण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितले.

मराठीसाठी नव्या पिढीने
योगदान द्यावे ः केरकर
संमेलनाध्यक्ष राजेंद्र केरकर यांनी मराठीची राजभाषा व सहभाषा म्हणून फसवणूक केलेली आहे त्या काळात नारायण आठवले व अनेकानी मोठे आंदोलन केले. त्यावेळी गोमंतक मराठी अकादमीने मोठी भरारी घेतली होती. पुन्हा एकदा नव्या गतीने मराठीची पताका उत्तुंगतेच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी नव्या पिढीने योगदान देण्याची गरज आहे असे स्पष्ट केले. साखळी सत्तरीला संस्कृतीचा साहित्याचा पराक्रमाचा शौर्याचा मोठा इतिहास असून अनेक दिग्गजांनी या भागात साहित्य समृद्धीत मोठे योगदान दिलेले आहे. दीपाजी राणेंचा शूर वीरांचा इतिहास आहे. रामदास कामत, गुंजी नाईक, मंगेश बोरकर, नातू गुरुजी, श्यामसुंदर कर्पे, नारायण सावंत, पांडुरंग पिसुर्लेकर आदी दिग्गजांची साहित्य निर्मिती व मराठीच्या अस्मितेसाठी दिलेले योगदान फार मोठे आहे. या लोकांनी या प्रदेशाचा आत्मस्वर मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी खूप योगदान आहे.
पोर्तुगीज काळातही मराठी भाषेचे अस्तित्व तितक्याच सक्षमतेने टिकवून ठेवण्यासाठी अनेकांचे योगदान आहे. मराठी भाषेचा लौकिक जागतिक पातळीवर वाढलेला असून मराठी भाषेने उत्तुंग शिखरे गाठण्यासाठी अनेक व्यक्तिमत्त्वांनी योगदान दिले असल्याचे केरकर यांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण

नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर देण्यावर भर देण्यात आलेला असून व्यावसायिक शिक्षण ही मातृभाषेतून हवे यासाठी ही सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भाषांच्या माध्यमातून मराठी भाषेचा विषय येतो तेव्हा स्थानिक भाषेचे महत्त्व युवा पिढीला पटवून देणे गरजेचे आहे. भाषा ही उदरनिर्वाहाचे साधनही होऊ शकते याची उदाहरणही अनेक आम्हाला दिसून येतात. भाषा मनावर संस्कार बिंबवत असते. आपण भाषा शिकतो, मातृभाषा शिकतो त्या वेळा आपली संकल्पना निश्चित होते असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.