>> दिवसभरात ऊन-पावसाचा खेळ; आज तुरळक सरींची शक्यता
गेल्या चार दिवसांत चांगली हजेरी लावल्यानंतर सोमवारी दिवसभरात पावसाने पुन्हा दडी मारल्याचे दिसून आले. सायंकाळच्या वेळेस काही क्षणांसाठी ऊन-पावसाचा खेळ रंगला होता. मंगळवारी राज्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राज्यात मागील चार दिवसांत सुमारे 7.10 इंच पावसाची नोंद झाली. मसंच मागील चोवीस तासांत सुमारे 1.74 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत एकूण 14.05 इंच पावसाची नोंद झाली असून, पावसाची तूट 53.8 टक्के एवढी आहे.
मागील चार दिवसांत चांगल्या पावसाची नोंद झाली होती. तसेच येत्या 28 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने शनिवारी वर्तवला होता; मात्र अधूनमधून तुरळक सरीच कोसळल्या.
पणजी येथील विकासकामासाठी खोदकाम करण्यात आलेल्या रस्त्यांची पावसाळ्याच्या तोंडावर हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पहिल्या पावसात दुरुस्त केलेले रस्ते खचण्यास प्रारंभ झाला आहे. येथील माजी सैनिक क्लिनिकजवळील मुख्य रस्ता पूर्ण खचला आहे. तसेच, शहरातील इतर भागातील दुरुस्त केलेले रस्ते खचण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पणजीत आत्तापर्यंत एकूण 9.80 इंच पावसाची नोंद झाली
आहे.
राज्यातील प्रमुख धरणामध्ये पाण्याची पातळी अजूनपर्यंत वाढलेली नाही. राज्यात प्रमुख धरणांमध्ये 22 टक्के पाणी आहे. अंजुणे धरणामध्ये केवळ 3 टक्के आणि पंचवाडी धरणामध्ये 5 टक्के पाणी आहे. गावणे धरणामध्ये 35 टक्के, आमठाणे धरणामध्ये 41 टक्के आणि चापोली धरणामध्ये 41 टक्के पाणी आहे.