>> साळावली धरण तुडुंब, आतापर्यंत 72 इंच पाऊस
राज्यभरात पावसाचा जोर कायम असून चोवीस तासांत 2.21 इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने राज्यात 21 जुलैपर्यत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात 22 आणि 23 जुलै रोजी काही भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात आत्तापर्यत 72.27 इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे सर्वाधिक 82.33 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील प्रमुख साळावली धरण तुडुंब भरून काल सकाळपासून वाहू लागले आहे. राज्यातील अंजुणे धरण वगळता इतर प्रमुख धरणातील पाण्याचा साठा भरपूर वाढलेला आहे. पंचवाडी धरणसुद्धा भरले आहे.
चोवीस तासांत फोंडा येथे सर्वाधिक 3.68 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा 2.05 इंच, पेडणे 2.18, पणजी 1.91, साखळी 1.49, वाळपई 3.47, काणकोण 1.11, दाबोळी 2.23, मडगाव 1.88, मुरगाव 1.64, केपे 2.37, तर सांगे येथे 2.75 इंच पावसाची नोंद झाली आहे.
सांगेपाठोपाठ केपे येथे 80.55 इंच, मडगाव येथे 78.49 इंच पावसाची नोंद झाली आहे.
पडझडीच्या 112 घटना
राज्यात चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या आणखी 112 घटनांची नोंद झाली आहे. तसेच एकूण 9.11 लाखांचे नुकसान झाले आहे.