राज्यात पावसाचा जोर कायम

0
24

>> पुढील दोन दिवसांत जोरदार वृष्टीचा इशारा

शनिवार पाठोपाठ काल रविवारीही राज्यात पावसाचा जोर कायम राहिला. विशेष करून रविवारी सकाळी राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस कोसळला. पुढील दोन दिवस म्हणजेच १४ जूनपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहणार आहे. गेल्या २४ तासांत सर्वांत जास्त पाऊस मुरगावमध्ये कोसळला. तेथे नोंद झालेला पाऊस हा १८० मी.मी. एवढा होता. त्या पाठोपाठ राजधानी पणजीतही जोरदार पाऊस कोसळला. राज्यात गेल्या २४ तासात १२७ मी.मी. एवढ्या पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेने दिली.

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस म्हणजेच येत्या १४ जूनपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मात्र, त्यानंतर पाऊस कमी होणार असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

आज दि. १३ रोजी नारंगी रंगाचा इशारा हवामान खात्याने दिलेला असून दक्षता बाळगण्याची सूचना केली आहे. तर उद्या दि. १४ रोजी पिवळ्या रंगाचा इशारा दिला असून लक्ष ठेवा अशी सूचना दिली आहे. आज १३ रोजी राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. १४ रोजीही काही भागात धुवांधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पावसाबरोबरच ताशी ४० कि.मी. अशा वेगाने वारे वाहणार असल्याचे खात्याने म्हटले आहे. १५ व १६ रोजी पाऊस कमी होणार असून हिरव्या रंगाचा इशारा खात्याने दिला आहे.
दक्षिण गुजरात समुद्रकिनार्‍यापासून केरळ समुद्रकिनार्‍यापर्यंत ऑफशोअर ट्रफमुळे पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार आहे. येत्या १६ जूनपर्यंत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.