राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय

0
5

बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थितीमुळे राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने राज्यात 14 जुलै आणि 17 जुलै रोजी राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच ताशी 40 ते 50 किलो मीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

राज्यात चोवीस तासांत पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ झाली असून, साधारण 0.77 इंच पावसाची नोंद झाली. पणजी येथे सर्वाधिक 1.25 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 56.90 इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात येत्या 15, 16, 18 आणि 19 जुलै रोजी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात तीन दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर पुन्हा गती घेतली आहे. पणजी पाठोपाठ पेडणे येथे 1.09 इंच, साखळी येथे 0.92 इंच, मुरगाव येथे 0.78 इंच, केपे येथे 0.93 इंच, सांगे येथे 0.95 इंच पावसाची नोंद झाली.

वाळपई विभागाने पावसाचे इंचाचे अर्धशतक ओलांडले असून, वाळपई येथे आत्तापर्यंत एकूण 50.59 इंच पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी वाळपई परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अकरा विभागाने आत्तापर्यंत इंचाचे अर्धशतक ओलांडले आहे. केवळ, जुने गोवा आणि साखळी या विभागांनी अजूनपर्यंत इंचाचे अर्धशतक ओलांडलेले नाही. जुने गोवा येथे 48.90 इंच आणि साखळी येथे 48.93 इंच पावसाची नोंद झाली आहे.