राज्यात नवे ७७ रुग्ण

0
145

>> पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१८वर

राज्यात नवीन ७७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. कुडचडे, थिवी येथे नवीन आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१८ झाली आहे. मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये उपचार घेणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या एका नगरसेवकांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह १११ रुग्ण काल बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यत १७६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून त्यातील ९३६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सुमारे ५० टक्के रुग्ण बरे झाले. सुमारे २ हजारांवर कोविड चाचण्या केल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

चिंबलमध्ये नवीन ३९ रुग्ण
इंदिरानगर, चिंबल येथे नवीन १५ आणि चिंबल येथे नवीन २४ रुग्ण मिळून एकूण ३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. चिंबलमधील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८० झाली आहे.

कामराभाट, शंकरवाडीत नवीन रुग्ण
कामराभाट- टोंक येथे नवीन पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पणजी महानगरपालिकेच्या काही कर्मचार्‍यांचा त्यात समावेश आहे. कामराभाटातील रुग्णांची संख्या ७ झाली आहे. शंकरवाडी येथे ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

वझरीत आणखी पाच रुग्ण
पेडणे तालुक्यातील वझरी पंचायत क्षेत्रात आणखी पाच जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संख्या दहावर पोहोचली आहे. एकूण पन्नास जणांची चाचणी केली होती. एकूण १० कोरोना रुग्ण वझरी पंचायत क्षेत्रात सापडलेले आहेत.

फोंड्यात कोरोनाचे ९ रुग्ण
फोंडा येथे नवीन ९ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या १९ झाली आहे. शिरोडा येथे नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ७ झाली आहे.