राज्यात नवे सरकार युतीचेच

0
11

>> कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डच्या नेत्यांचा दावा

राज्यातील लोकांना आता बदल हवा असून, त्यासाठी लोकांनी सोमवारी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डच्या युतीच्या उमेदवारांना आपला कौल दिला आहे. राज्यात नवे सरकार हे कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीचेच असेल. तसेच युतीला अंदाजे २६ जागा मिळतील, असा विश्‍वास काल कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी व्यक्त केला.

कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड युतीच्या नेत्यांनी काल मंगळवारी आपल्या सर्व उमेदवारांसह पणजीत बैठक घेऊन सोमवारी झालेल्या मतदानाविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी या नेत्यांनी पक्षाला एकूण किती जागा मिळू शकतात. कुठल्या कुठल्या मतदारसंघांत पक्षाला किती मते मिळू शकतात, याविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, दिगंबर कामत आदी नेते उपस्थित होते.

यावेळी गिरीश चोडणकर म्हणाले की, गोवा विधानसभेची ही निवडणूक देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे. मतांचे विभाजन होऊन भाजपला त्याचा फायदा होऊ नये, याकडे मतदारांनी खास लक्ष दिले आहे. मतदारांनी यावेळी भाजपला हरवण्यासाठीच मतदान केले आहे. त्यामुळे यावेळी भाजपला १० पेक्षा कमी जागा मिळतील, असा दावाही चोडणकर यांनी केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पराभूत होतील
या निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व बाबू कवळेकर हे पराभूत होतील, असेही गिरीश चोडणकर म्हणाले. भाजपची राजवट आता संपल्यात जमा असून, कॉंग्रेसच नवे सरकार स्थापन करेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.