राज्यात नवीन ११ कोरोना रुग्णांची भर

0
151

 

राज्यात काल कोरोना विषाणूबाधित नवीन ११ रुग्ण आढळून आले असून ३ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना (ऍक्टीव्ह) रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. अशी माहिती आरोग्य खात्याने काल दिली.

शनिवारी नवी दिल्लीहून राजधानी एक्सप्रेसमधून आलेल्या ११ प्रवाशांना कोरोना बाधा झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. ११ प्रवाशांमध्ये ७ महिला, ४ पुरुषांचा समावेश असून त्यात एका ५ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६६ एवढी झाली आहे. त्यातील १९ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील ऍक्टीव्ह कोरोना विषाणू रुग्णांची संख्या ४७ एवढी झाली आहे. गेल्या शुक्रवारी ९ कोरोना रुग्ण बरे झाले होते. तर, रविवारी आणखी ३ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. गोमेकॉच्या वॉर्डात कोरोना संशयित ३ रुग्णांना दाखल करण्यात आले असून कोरोना आयझोलेेशन वॉर्डात कोरोना संशयित ३ जणांवर उपचार सुरू आहेत.

जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत मागील २४ तास कोरोनाच्या ५९१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ५८० नमुने निगेटिव्ह आहेत आणि ११ नमुन्यांचा अहवाल पॉझिटीव आला आहे. या कोविड प्रयोगशाळेत एकही नमुन्याचा अहवाल प्रलंबित नाही.आंतरराज्य प्रवास केलेल्या २०९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर, ३५३ जणांना सरकारी क्वारंटाईऩ सुविधेखाली आणण्यात आले असून सरकारी क्वारंटाईनखाली ७०५ जणांना ठेवण्यात आले आहे.
गोवा राज्याला रेल्वेगाड्यांची प्रवासी वाहतूक घातक ठरू लागली आहे. गोव्यात स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून येत नाही. तर, परराज्यातून रेल्वे व इतर मार्गाने येणार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून येत आहे. राज्यात आत्तापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये रेल्वे गाड्यातून ६० ते ७० टक्के कोरोनाबाधित आल्याचे तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वेगाड्या सुरू ठेवण्यास बर्‍याच जणांकडून विरोध केला जात आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजधानी एक्सप्रेस तूर्त येणार नसल्याचे मागील आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. तथापि, शनिवारी नवी दिल्लीतून राजधानी एक्सप्रेस दाखल झाली.