राज्यात सरत्या २०१९ वर्षाला निरोप देत नवीन वर्ष २०२० चे मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांसह स्वागत करण्यात आले.
नवीन वर्षानिमित्त ठिकठिकाणी नवीन वर्ष स्वागत सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. येथील सांता मोनिका जेटीवर स्वागत कार्यक्रम पार पडला. यात स्वागत कार्यक्रमात देशी-विदेशी पर्यटक तसेच नागरिकांनी सहभागी घेतला. सरत्या वर्षानिमित्त पर्यटक आणि नागरिकांनी समुद्रकिनार्यांवर गर्दी केली होती.
नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त विविध शहरे व गावातील चर्चमध्ये खास प्रार्थना सभा पार पडल्या. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नवीन वर्ष स्वागत कार्यक्रमामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. कुठल्याही भागात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस गस्त सुरू होती. बेशिस्त व नशेत वाहने चालविणार्याविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात होती.
राज्यपालांकडून गोमंतकीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा
गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील लोकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्षाचा आनंदाचा क्षण आहे. अनेकांसाठी नवीन वर्ष समारंभ म्हणजे मागील वर्षाचा अनुभव घेऊन जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी चांगली संधी आहे. जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही आपले विचार ताजे करतो आणि वचनबद्धतेसाठी नव्याने तयारीला लागतो. नवीन वर्ष आपल्याला नवीन आशा आणि आकांक्षा घेऊन येते. नवीन वर्ष म्हणजे प्रत्येकांच्या जीवनातील खरोखरच एक नवीन अध्याय आहे. सलोख्याने आणि एकतेने राहण्याचा आमचा संकल्प मजबूत करण्यास हा योग्य प्रसंग आहे.