राज्यात धर्मांतराला कदापि थारा नाही : मुख्यमंत्री

0
5

>> आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे योगदान; साखळीत बिरसा मुंडा गौरव यात्रेचे आयोजन

दुर्लक्षित आदिवासी समाजाला राज्यात आणि देशपातळीवर खरा न्याय मिळवून देण्याचे काम गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. त्यापूर्वी 60 वर्षे विविध राजवटीतील आदिवासींच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. देशपातळीवर त्यांच्या धर्मांतराचे प्रकार सुरू आहेत. तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आदिवासींना ‘सॉफ्ट टार्गेट’ करून त्यांचे धर्मांतर करण्याचे जे प्रकार राज्यात चालू आहेत, ते यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत राज्यात धर्मांतराला थारा दिला जाणार नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

भगवान बिरसा मुंडा गौरव यात्रेनिमित्त साखळी येथील रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील इशारा दिला. यावेळी त्यांच्या हस्ते बिरसा मुंडा गौरव यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते, दशरथ रेडकर, रोहन कासकर, सिद्धी प्रभू, गोपाळ सुर्लकर आदी उपस्थित होते.

देशातील तरुण वर्गाने भगवान बिरसा मुंडा यांचा आदर्श घ्यायला हवा. त्यांनी जल, जमीन, जंगलाच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध लढा दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्या काळात इंग्रजांनी वेगवेगळ्या माध्यमातून आदिवासींना ‘सॉफ्ट टार्गेट’ करत धर्मांतराचा प्रयत्न केला, त्याविरोधात बिरसा मुंडा यांनी आवाज उठवला, त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विद्यमान केंद्र सरकारच्या काळात आदिवासी समाजाला आज देशपातळीवर मोठी उभारी मिळालेली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो कोटींच्या योजना राबवताना प्रत्येक घराला समृद्ध देण्याचा संकल्प केलेला आहे. गोव्यातही त्याच उद्देशाने मोठे कार्य झाले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
राज्यातील आदिवासींचे वनहक्क दाव्यांचे सुमारे 10 हजार अर्ज आलेले असून, आपल्या काळात सुमारे अडीच हजार अर्ज आपण निकालात काढल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

बिरसा मुंडा यांचा आदर्श घेऊन युवा पिढीने जल, जंगल व जमीन रक्षणासाठी कार्यरत राहावे व कोणत्याही प्रकारे कसलेही आक्रमण आपल्या धर्मावर होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.