गेल्या आठवडाभर सतत कोसळणार्या जोरदार पावसामुळे बेळगांव शहरातून भाजी, दूध आदी माल घेऊन गोव्यात येणारी वाहने बेळगांव – गोवा महामार्गावरील पूर व दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यात येऊ न शकल्याने गोव्यात दूध व भाजीची टंचाई निर्माण झाली आहे. भाज्यांचे दरही भडकले आहेत.
सध्या पडत असलेल्या जोरदार पावसामुळे बेळगांव – गोवा महामार्गावर चोर्ला घाट येथे रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. त्याशिवाय बेळगांव – गोवा असा दुसरा मार्ग असलेल्या रस्त्यावरही आंबोली घाटात झाडे उन्मळून पडल्याने तेथील वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे. फक्त कारवारच्या बाजूला गोवा – बेळगांव महामार्ग खुला आहे. परिणामी गोव्यात दूध, भाजी घेऊन येणारे मालवाहू ट्रक अडकून पडल्याने गोव्याला माल पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. पाऊस कमी होत नाही. तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
कारवार मार्गाने मर्यादित प्रमाणात माल घेऊन वाहने येत आहेत. तर काही माल रेल्वेतून येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.