राज्यात गेल्या 24 तासांत तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. बस्तोडा-म्हापसा येथील स्वयंअपघातात जखमी 21 वर्षीय तरुणाचे उपचारादरम्यान निधन झाले. कांसावली-कुठ्ठाळीतील अपघातात 43 वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला, तर वाघुरे-पिसुर्ले येथील दुचाकी अपघातात 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांसावली-कुठ्ठाळीतील अपघात रविवारी रात्री 7.40 वाजता घडला. संगीता बिंद (43, सध्या रा. वेर्णा, मूळ उत्तरप्रदेश) ही आपल्या पती व मुलीसमवेत थ्री किंग्ज हॉल, कासावलीजवळ रस्त्याच्या कडेला चालत बाजारातून घरी जात होती. त्याचवेळी मद्याच्या नशेत असलेल्या दुचाकीचालक आर्यन गावडे (21, शिरोडा-फोंडा) याने त्यांना धडक दिली. त्यात संगीता बिंद हिला जोरदार धडक बसून ती गंभीर जखमी झाली. तसचे पती व मुलगी यांनाही दुखापत झाली. त्यांना तातडीने येथील इस्पितळात हलविले; मात्र डॉक्टरांनी संगीता हिला मृत घोषित केले.
या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी दुचाकीचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मागे बसलेला युवकही जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले.
21 वर्षीय तरुण ठार
बेस्तोडा-म्हापसा येथे एका स्वयंअपघातात जखमी झालेला दुचाकीचालक साईराज मोरजकर (21) याचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना काल निधन झाले. सोमवारी दुपारी साईराज याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला होता, त्यात साईराज हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते.
रेंट-अ-कारची महिलेला धडक
बांबोळी येथे काल संध्याकाळी एका भरधाव रेंट-अ-कारने एका पादचारी महिलेला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारार्थ बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर रेंट-अ-कारने महिलेला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या अन्य एका कारलाही धडक दिली. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
वाघुरे-पिसुर्लेत दोन दुचाकींच्या धडकेत वृद्ध ठार
पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील वाघुरे शिंगणे दरम्यानच्या मार्गावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात महादेव दत्ता गावडे (70, रा. शांतीनगर पिसुर्ले) यांचा मृत्यू झाला, तर कृष्णा संजय वायंगणकर (20, रा. अडवई पेडानी) हा दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. त्याला साखळी येथील सरकारी सामाजिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हा अपघात काल संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडला.
सविस्तर माहितीनुसार, महादेव दत्ता गावडे हे गेल्या काही वर्षापासून उदरनिर्वाहासाठी आपल्या मोटरसायकलने खासगी भाडे मारीत होते. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ते एका इसमाला शिंगणे सत्तरी या ठिकाणी पोचविण्यासाठी गेले होते. त्याला सोडून पुन्हा पिसुर्लेत येत असताना शिंगणे येथे समोरून येणाऱ्या दुचाकीशी समोरासमोर टक्कर झाली. दोन्ही चालकांचा वाहनांवरील ताबा सुटल्यामुळे ते रस्त्यावर पडले. महादेव गावडे यांच्या डोक्याला व सर्वांगाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना साखळी येथील सरकारी सामाजिक रुग्णालयात 108 सेवेतून उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. वाळपई पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉमध्ये पाठवला. कृष्णा वायंगणकर याला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.