राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. गोव्याच्या विकासात तिसर्या जिल्ह्यामुळे मोठी भर पडणार आहे. येत्या वर्षभरात तिसर्या जिल्ह्याचा आराखडा तयार केला जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धारबांदोडा येथे काल केली.
धारबांदोडा तालुक्यातील प्रमुख सरकारी इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित राय, पंचायतीचे सरपंच, उपसरपंच व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
संजीवनी बंदबाबत
निर्णय नाही
संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. संजीवनी कारखान्याच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढला जाणार आहे. संजीवनी साखर कारखान्याच्या आसपासच्या जागेत शेतकरी व स्थानिकांना उपयुक्त असा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
धारबांदोड्यात ट्रक
टर्मिनल शक्य
धारबांदोडा येथे ट्रक टर्मिनल उभारला जाऊ शकतो. या ठिकाणी सरकारची मोठी जमीन सुध्दा उपलब्ध आहे. या ट्रक टर्मिनलमुळे विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सावर्डे मतदारसंघातील आरोग्य, पंचायत, शिक्षण या विभागात सुरू असलेली विविध विकास कामे डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती बांधकाम मंत्री पाऊसकर यांनी याप्रसंगी बोलताना दिली.