राज्यात ड्रग्सचे ‘हॉटस्पॉट’ नाहीत : मुख्यमंत्री

0
9

>> आमदार वीरेश बोरकर यांचा आरोप फेटाळला

एक मोठे पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात आल्यानंतर काही पर्यटक येथे अमलीपदार्थांचे (ड्रग्स) सेवन करीत असतात, ही गोष्ट खरी आहे. अमलीपदार्थांचे सेवन करणाऱ्या अथवा त्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम पोलीस करतात, असे काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले; मात्र गोव्यात अमलीपदार्थांचे ‘हॉटस्पॉट’ असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.

काल प्रश्नोतराच्या तासाला विधानसभेत रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी सदर प्रश्न मांडला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री या नात्याने वरील खुलासा केला.
गोव्यात अमलीपदार्थांचे काही ‘हॉटस्पॉट’ आहेत व हे अमलीपदार्थ आता राज्यातील महाविद्यालयातही पोचले असल्याचा आरोप काल वीरेश बोरकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हा आरोप फेटाळून लावताना राज्यात कुठेही अमलीपदार्थांचे हॉटस्पॉट नाहीत. तसेच महाविद्यालतही अमलीपदार्थ पोचले, हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्या उत्तरावर बोरकर यांचे समाधान झाले नाही. हणजूणसह राज्यातील किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ उपलब्ध होत आहेत. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये कित्येक किलो अमलीपदार्थ एका महाविद्यालयात जप्त केला होता, असे संबंधित महाविद्यालयाचे नाव घेऊन बोरकर यांनी सांगितले असता, मुख्यमंत्र्यांनी त्याला आक्षेप घेत सदर महाविद्यालयात अमलीपदार्थ सापडले नव्हते, असा दावा केला. यावेळी वीरेश बोरकर यांनी त्यासंबंधी वृत्तपत्रात जे वृत्त प्रसिद्ध झाले होते, त्याची कात्रणेही सभागृहात सादर केली; मात्र, मुख्यमंत्र्यांनी ते वृत्त खोटे असल्याचे सांगितले.

राज्यात कुठेही अमलीपदार्थांचे हॉटस्पॉट नाही. पर्यटक एखादवेळी मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ घेऊन येतात आणि मग ते पोलीस छाप्यात सापडतात. अशा ठिकाणी अमलीपदार्थ सापडले म्हणून ते स्थळ अमलीपदार्थांचे हॉटस्पॉट ठरत नसल्याचा युक्तिवाद मुख्यमंत्र्यांनी केला.
अमलीपदार्थ घेऊन येणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई केली जात असून, छापे मारुन त्यांना पकडण्यात येते. चालू वर्षी अशा प्रकारे 36 ठिकाणी छापे मारुन, तर गेल्या वर्षी 68 ठिकाणी छापे मारुन अमलीपदार्थ जप्त करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ड्रग्समिश्रित केकची विक्री : व्हिएगस
यावेळी आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी अमलीपदार्थ आता विद्यालयातही मिळत असल्याचा आरोप केला. केक व अन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या काही दुकानांत ‘अरिजुवाना बाऊनी’ व ‘विड केक्स’ हे अमलीपदार्थांचा वापर करुन तयार करण्यात येत असलेले केक विकण्यात येत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच मुख्यमंत्र्यांनी अशा ‘केक शॉप्स’वर कारवाई करावी, अशी सूचना केली. त्यावर आपण पोलिसांना तसे आदेश देतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.