राजधानी पणजीसह राज्यातील अनेक भागात वादळी वारा, गडगडाटासह अवकाळी पाऊस काल संध्याकाळी कोसळल्याने धांदल उडाली. सावईवेरे परिसरात गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू झाल्याने गैरसोय झाली. पावसामुळे गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून लोकांना दिलासा मिळाला.
पणजी हवामान विभागाने सांगे, धारबांदोडा, सत्तरी तालुक्यातील काही भागात जोरदार वार्यासह पाऊस कोसळण्याचा इशारा दिला होता. धारबांदोडा, फोंडा तालुक्यात वादळी वारा आणि पावसाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली आहेत. खांडेपार येथे विजेचा खांब मोडून पडला. तिवरे येथे एका पार्क केलेल्या गाडीवर झाड मोडून पडल्याने नुकसान झाले. या वादळी वार्यामुळे अनेक भागात मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
डिचोली तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड
डिचोली तालुक्यात वादळी वार्यासह पावसाने झोडपल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली. सायंकाळी साडे चारच्या सुमारास वादळ झाल्याने डिचोली साखळी, मये, कुडणे, न्हावेली आदी भागात झाडे पडून नुकसानी झाली. तसेच पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले.
डिचोली अग्निशामक दलाचे जवान मदत कार्यात गुंतले आहेत. विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचे काम सुरू आहे.