राज्यात चौथी लाट आल्यास मुलांना धोका

0
22

>> डॉ. राजेंद्र बोरकर यांचा इशारा

>> सर्व प्रौढ व्यक्तींना तिसरा डोस घेण्याचे आवाहन

गोव्यात जर कोविड महामारीची चौथी लाट आली तर या महामारीचा सर्वात जास्त धोका हा लहान मुलांना असेल अशी भीती काल राज्य लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील सर्व प्रौढ व्यक्तींनी कोविडचा तिसरा डोस घ्यावा असे आवाहनही डॉ. बोरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

लसीकरण हेच कोविडवरील प्रभावी असे शस्त्र आहे, असे सांगून डॉ. बोरकर यांनी, जर राज्यात पुन्हा कोविड महामारीची लाट आली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असा इशारा दिला.

ज्येष्ठ नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा ः डॉ. काकोडकर

राज्यातील ज्येष्ठ नागरिक व गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या व्यक्तींनी कोविडचा बुस्टर डोस घ्यावा. डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढण्यास ८ आठवड्यांचा काळ लागत असल्याचे काल आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. कोविड डोसमुळे रोगाप्रती निर्माण झालेली प्रतिकार शक्ती ही कालांतराने कमी होत असते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

तोंडावर मास्क परिधान करणे हे सक्तीचे नसले तरी लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

गोव्यात रोज सरासरी कोविडचे १० रुग्ण सापडत असून राज्यात जर कोविडची चौथी लाट आली तर तिचा सामना करण्यास गोवा सक्षम असल्याचे त्या म्हणाल्या.

देशात चोवीस तासांत
रुग्णसंख्या खालावली

देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचे नवे २ हजार २८८ रुग्णांची नोंद झाली असून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत ही मोठी घट असून आदल्या दिवशी ३२०७ कोरोनाबाधितांची नोंद आणि २९ जणांचा मृत्यू झाला होता.

बाधितांच्या संख्येत घट
देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७४ टक्के आहे. देशात एकुण ४ कोटी २५ लाख ६३ हजार ९४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ३१ लाख ७ हजार ६८९ झाली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १९ हजार ६३७ इतकी झाली आहे.