राज्यात कोरोनाने ११ जणांचा मृत्यू

0
304

>> कोरोना बळींनी ओलांडला अडीचशेचा टप्पा

राज्यात आत्तापर्यंतच्या सर्वाधिक उच्चांकी ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूंची नोंद काल झाली आहे. राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने २५० चा टप्पा ओलांडला असून कोरोना बळींची एकूण संख्या २५६ वर पोहोचली आहे.

सासष्टीतील येथील ४५ वर्षांच्या महिला रुग्णाला मृतावस्थेत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आणण्यात आली. सदर महिलेचा मृत्यूनंतरचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इस्पितळातील १० बळी गेलेल्या रुग्णांपैकी ४ रुग्णांचा चोवीस तासात मृत्यू झाला आहे.

नवे ४५७ कोरोना पॉझिटिव्ह
राज्यात नवे ४५७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २१,६३० एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४४९९ एवढी झाली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविडसाठी स्वॅबच्या नमुन्यांची कमी तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी दिसून येत आहे. बांबोळी येथील प्रयोगशाळेत १७७४ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली असून त्यात ४५७ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच, प्रयोगशाळेत ४६८ स्वॅबच्या अहवालांची तपासणी प्रतीक्षेत आहे.
आरोग्य खात्याने १८७६ स्बॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. प्रयोगशाळेतील स्वॅबच्या दैनंदिन तपासणी अहवालामध्ये तफावत जाणवत आहे.

४४८ कोरोनामुक्त
कोरोना पॉझिटिव्ह ४४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १६,८७५ एवढी झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ३०७ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या ७९८७ एवढी झाली आहे. गोमेकॉच्या इस्पितळ आयसोलेशनमध्ये १८२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

पणजीत नवे २८ रुग्ण
पणजी शहर आरोग्य केंद्राच्या कक्षेत नवे २८ पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २१७ एवढी झाली आहे. पणजी परिसरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे.

८ दिवसांत ६४ बळी
सप्टेंबर महिन्यात कोरोना बळींच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून केवळ ८ दिवसांत ६४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल डिचोली येथील ४७ वर्षांची महिला रुग्ण, वास्को येथील ७० वर्षांचा पुरुष रुग्ण, चिंबल येथील ६० वर्षांचा पुरुष रुग्ण, चोडण येथील ४९ वर्षांचा पुरुष रुग्ण, फोंडा येथील ५६ वर्षांचा पुरुष रुग्ण, पेडणे येथील ६७ वर्षांचा पुरुष रुग्ण, केपे येथील ६५ वर्षांचा पुरुष रुग्ण, मडगाव येथील ५३ वर्षांचा पुरुष रुग्ण, पणजी येथील ६० वर्षांचा पुरुष रुग्ण, सांज जुझे दी आरियल येथील ६३ वर्षांचा पुरुष रुग्ण, सालसेत येथील ४५ वर्षांच्या महिला रुग्णाचे निधन झाले आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात ६ तर मडगाव येथील ईएसआय इस्पितळात ३ रुग्णांचा मृत्यू झाला. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.