राज्यात ऐन चतुर्थीत पावसाने उडवला कहर

0
107
धडे सावर्डे येथील श्री सिध्दारूढ देवस्थानाच्या मंदिराची कोसळलेली भिंत. (छाया : मंगेश नायक) मुरगांव बंदराकडे जाणार्‍या जेटी येथील डोंगराची मोठी दरड कोसळली त्याचे छायाचित्र. (छाया : प्रदिप नाईक)

काम्राभाट – ताळगावमधील १०० कुटुंबांना हलविले : मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
ऐन चतुर्थीच्या काळात संततधार पावसाने कहर माजवला असून राजधानी पणजीसह वास्को, सावर्डे तसेच ग्रामीण भागांनाही फटका बसला आहे. याचबरोबरच चतुर्थीच्या उत्साहावरही बरेच विरजण पडले आहे. राज्यभरातील बाजारांमध्ये माटोळी साहित्य विकणार्‍यांनाही फटका बसला आहे. जेटी-वास्को येथे भली मोठी दरड कोसळली असून प्रचंड खडक रस्त्यानजीक येऊन झाडांमध्ये अडकले आहेत. तर धडा-सावर्डे येथील सिध्दारूढ देवस्थानजवळील संरक्षक भिंत देवस्थानच्या भिंतीवर कोसळल्याने देवस्थानचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पणजीतील सर्व नाल्यांवर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली व पाणी रस्त्यांवरून सलग दोन दिवस वाहत आहे.
काम्राभाटात मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
१०० कुटुंबाना हलविले
काम्राभाट, ताळगाव, सांताक्रुझ, मळा – पणजी या भागांमध्ये काल पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. विशेषतः काम्राभाट येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील लोकांचे हाल झाले. त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय तेथील सरकारी शाळेत करण्यात आल्याचे स्थानिक भाजप नेते दत्तप्रसाद नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तेथील परिस्थितीची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाहणी केली. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचे अधिकारीही त्यांच्या समवेत होते. दरम्यान, आल्तिनो पणजी येथेही एका घरावर दरड कोसळल्याचे सांगण्यात आले. महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी वरील भागांची पाहणी केली. सांतइनेज काकुलो फोर्ड शोरूमनजीकचे दोन्ही नाले तुडुंब भरून साकवांवरून गुडघाभर पाणी वाहत होते. नाल्याच्या काठावरील दुकाने व घरांमध्ये कालही पाणी साचले होते.
वास्को – जेटी येथील दरड कोसळली
जेटी येथे काल मध्यरात्री दीडच्या सुमारास धोकादायक दरड कोसळल्याने मुरगांव व बंदरापर्यंत जाणारा रस्ता वाहतुकीस काही काळ बंद झाला. सुदैवाने दरडीपासून एक मीटरावरील ४-५ घरे वाचली व वित्तहानी बरोबर जीवितहानीही टळली.
जेटी, रुमडावाडा ते बोगदापर्यंतच्या डोंगरमाथ्यावरील टेकडी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने या परिसरातील घरमालकांना घरे खाली करण्याचा आदेश शासनाकडून दर वषीं देण्यात येत असतो. परंतु या आदेशाला न जुमानता सदर परिसरातील लोक या भुसभुसीत मातीत उभी केलेल्या घरांना दोन दोन मजल्याचे स्वरूप देऊन तेथे एकप्रकारे या डोंगरावर आणखी बोजा निर्माण केला आहे.
वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्या निवासस्थानांपासून २५ मीटर अंतरावरील टेकडीची एक मोठी दरड झाडांसह सडा तसेच मुरगांव बंदरापर्यंत जाणार्‍या रस्त्यावर कोसळली. भले मोठे तीन चार खडक भुसभुसीत मातीत तसेच झाडांच्या मुळापर्यंत अडकल्याने ते रस्त्यावर येऊ शकले नाही. वीजमंत्री श्री. नाईक यांना वृत्त कळल्यावर त्यांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दल आणि वीज खात्याला कल्पना दिली. यावेळी स्थानिक नगरसेवक संजय सातार्डेकरही घटना गेले. अग्निशामक दल व वीज खात्यातर्फे मुख्य रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आला. सदर टेकडीवरील मोठी झाडे वीज वाहिन्यांवर कोसळल्याने रस्त्याच्या कडेला असलेले वीज खांब आणि वीजतारा कोसळल्या. यावेळी वीज खात्याचे सहाय्यक अभियंते, ज्युनियर इंजिनीयर श्री. पाल आणि अन्य कर्मचारी वर्गाने पावसाची तमा न बाळगता खंडीत झालेला वीज पुरवठा पूर्ववत केला. तसेच कोसळलेले वीजखांब पूर्ववत उभे केले.
जेटी येथे कोसळलेल्या दरडीची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून दिवसेंदिवस या भागात जेटी ते बोगदा जनतेने सावध रहावे असे अवाहन प्रशासनाने केले आहे. २० वर्षांपूर्वी तारीवाडा येथे अशीच दरड कोसळून सुमारे २२ घरे गाडली गेली होती.
सिध्दारूढ देवस्थानवर संरक्षक भिंत कोसळून नुकसान
सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे काल शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजता धडे सावर्डे येथील श्री सिध्दारूढ देवस्थानाजवळील संरक्षक भिंत कोसळून ती देवस्थानच्या भिंतीवर पडल्याने देवालयाची एक भिंत कोसळली व मोठा गोंधळ उडाला. या दुर्घटनेत देवस्थानाचे सुमारे सहा लाख रु.चे व संरक्षक भिंतीचे २० हजारांच्या आसपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडल्याचे गांवकर्‍यांचे म्हणणे असून या दुर्घटनेत मंदिराच्या मागे टेकडीवर असलेले रत्नाकर नाईक यांची दोन घरेही कोसळण्याच्या मार्गावर असल्याने त्यांना घरांतून इतरत्र हलविले असून या धोक्याच्या घरात कोणीही राहू नये असे घरांतील मंडळीना सूचना केली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहचल्या. सावर्डेचे आमदार गणेश गांवकर, पोलीस उपाधीक्षक सुभाष गोलतेकर, कुडचडेचे निरीक्षक रविंद्र देसाई, अग्निशामक दलाचे प्रमुख दिलीप गांवस, सावर्डेचे सरपंच शशिकांत नाईक, बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंते हेमंत देसाई, फलोत्पादन महामंडळाचे संचालक मोहन गांवकर, पंच सदस्य संजय नाईक यांनी भेट दिली.
आमदार गांवकर यांनी सध्या तात्पुरती व्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. धडे येथे सर्वच घरे एकमेकांना लागून असल्याने त्याचप्रमाणे टेकडीवरून वाहणार्‍या पाण्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका असून यासाठी नियोजनबध्दपणे आराखडा तयार करून सर्वच घरांना संरक्षक भिंती बांधून दिलासा देण्याचा विचार आमदार गांवकर यांनी व्यक्त केला.
माती काढणे धोकादायक
सध्या तात्पुरती व्यवस्था म्हणून भिंत कोसळलेल्या ठिकाणी मंदिराचे छप्पर कोसळू नये म्हणून छप्पराला ठिकठिकाणी खालून लोखंडी पाईप लावून ठेवण्यात आले असून सध्या सतत पडत असलेल्या पावसामुळे या ठिकाणीची कोसळलेली दरडीची माती काढणेही धोक्याचे असल्याचे मात्र ही दरड कोसळून वर असलेली घरे कोसळू नये म्हणून लगेच त्या ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही दुर्घटना काल शनिवारी झाली असती तर शेकडो लोकांच्या जिवावर बेतण्याचा प्रसंग ओढवला असता.
सांगेचे मामलेदार शंकर गांवकर यानी सावर्डेच्या तलाठ्याला या दुर्घटनेचा पंचनामा करून सविस्तर अहवाल पाठविण्याचा आदेश दिला आहे.