राज्यात सांघिक, वैयक्तिक पातळीवरील उत्कृष्ट खेळाडू तयार करण्यावर भर दिला जाणार असून, राज्यातील क्रीडा विकासाचा रोड मॅप तयार केला जाणार आहे, असे क्रीडा, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल सांगितले.
क्रीडा तथा कला व संस्कृती मंत्री गावडे यांनी पर्वरी येथील मंत्रालयात दोन्ही खात्यांचा ताबा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. राज्यातील तरुणांमधील क्रीडा गुण विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच क्रीडा साधनसुविधांचा योग्य वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरीसाठी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जाणार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.
गावडे यांनी कला व संस्कृती खात्याची जबाबदारी पुन्हा मिळाल्याने समाधान व्यक्त केले. कला अकादमीचा इमारत जुनी झाल्याने तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. म्हापसा आणि काणकोण भागात रवींद्र भवन उभारण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असेही ते म्हणाले.