राज्याला जुलै महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत जोरदार पावसाने झोडपून काढले. या दहा दिवसांत एकूण २९.९२ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ६३.४० इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण २८.३ टक्के जास्त नोंद झाले आहे.
गेल्या ७-८ जुलैला उच्चांकी ६.३६ इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यापूर्वी या महिन्यात ४-५ जुलैला ६.१४ इंच पावसाची नोंद झाली होती. उत्तर गोव्यात आतापर्यंत ६०.६७ इंच आणि दक्षिण गोव्यात ६५.४७ इंच पावसाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात पावसाचे प्रमाण २० टक्के आणि दक्षिण गोव्यात पावसाचे प्रमाण ३५.४ टक्के अधिक नोंद झाले आहे. जुलै महिन्यात दोन वेळा पुराचा तडाखा बसला आहे. या वर्षी आतापर्यंत केपे येथे सर्वांधिक पावसाची नोंद झाली आहे. पेडणे, काणकोण, सांगे येथेही मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. राज्यात जून महिन्यात एकूण ३३.२९ इंच पावसाची नोंद झाली आहे.
जुलै महिन्यात आतापर्यंतच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. राज्यातील काही भागांत पावसामुळे वृक्ष घरावर कोसळून हानी झाली आहे. संरक्षक भिंती कोसळून नुकसान झाले आहे. चंद्रेश्वर पर्वतावर जाणार्या रस्त्याला भगदाड पडले आहे. गुडी – पारोडा येथील पुलाची एका बाजूची संरक्षक भिंत वाहून गेलेली आहे. अग्निशामक दलाकडे मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटनांची नोंद झाली आहे.
राज्यात चोवीस तासांत पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. चोवीस तासात ०.८८ इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे. चोवीस तासांत वाळपई येथे सर्वाधिक ३.४४ इंच पावसाची नोंद झाली. काणकोण येथे १.७७ इंच, पेडणे येथे १.६८ इंच, फोंडा येथे १.६५ इंच, साखळी येथे १.३८ इंच, सांगे येथे ०.८७ इंच पावसाची नोंद झाली आहे.