राज्यात आतापर्यंत ४२ हजार कोरोनामुक्त

0
219

>> शुक्रवारी ३ मृत्यू, २०३ बाधित

राज्यातील आणखी २०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येने ४२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बरे झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ०५६ एवढी झाली असून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९९ टक्के एवढे आहे.
राज्यात चोवीस तासात नवीन २०३ रुग्ण आढळून आले असून आणखीन ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात आत्तापर्यंत २९ कोरोना रुग्णांचा बळी गेला असून राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या ६३३ झाली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ७४७ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या २०५८ एवढी आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत आणखी १७४० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन १०० रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३९ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

आणखी ३ रुग्णांचा मृत्यू
बांबोळी येथे गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना तीन कोरोना रुग्णाचे निधन झाले आहे. म्हापसा येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्ण, डिचोली येथील ७९ वर्षीय पुरुष रुग्ण आणि दिवाडी येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे.

नोव्हेंबरच्या ६ दिवसांत २९ बळी
राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या ६ दिवसांत २९ जणांचा बळी गेला आहे. आत्तापर्यंत डिचोली तालुक्यातील ९, बार्देश ६, सासष्टी ५, तिसवाडी व मुरगावातून प्रत्येकी २, सत्तरी, फोंडा व केपेतून प्रत्येकी १ रुग्ण आणि महाराष्ट्रातील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
चिंबल येथे १२५ रुग्ण, कोलवाळ येथे ११५ रुग्ण आहेत. दक्षिण गोव्यात मडगाव परिसरात १८४ रुग्ण आहेत. फोंडा परिसरात १४० रुग्ण, वास्को परिसरात ११७ रुग्ण आहे.