राज्यात आतापर्यंत १७० इंच पाऊस

0
251

ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यंत ४.६१ इंच पावसाची नोंद झाली असून यंदा पडलेल्या मोसमी पावसासह एकूण पाऊस १७०.०३ इंच एवढा झाला आहे. दरम्यान राज्यात आज शुक्रवार १६ ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने काल वर्तविली आहे.
गुरूवारी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यात गेल्या सहा दिवसापासून पाऊस पडत आहे. गेल्या चोवीस तासात ०.८५ इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसाळी मोसमानंतर पडणार्‍या पावसाचे प्रमाण सुध्दा सध्या १५ टक्के जास्त नोंद आहे.

चोवीस तासांत वाळपई येथे सर्वाधिक २.१३ इंच, साखळी येथे १.९२ इंच, सांगे येथे १.०४ इंच पावसाची नोंद झाली आहे. इतर भागात कमी पावसाची नोंद झाली आहे. तर, म्हापसा, पेडणे, काणकोण आणि केपे येथील पावसाची माहिती उपलब्ध झाली नाही. मच्छीमारांनी तूर्त समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.
पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नागरिकांना सहसा मोठ्या उकाड्याला तोंड द्यावे लागते. परंतु, या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पडणार्‍या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालेला आहे.