राज्यात आजपासून गणेशोत्सवाची धामधूम

0
87

भक्तांना अपेक्षा पाऊस थांबण्याची
गोव्यात आजपासून थाटामाटाने गणेशोत्सव साजरा केला जाणार असून त्यासाठीची तयारी काल गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला गोवाभरात जोरात चालू होती. काही भागातील लोकांनी कालच गणेशमूर्ती घरी आणल्या होत्या. माटोळीचे सामान, भाजी, मिठाई आदीची खरेदी काल गोवाभरात जोरात चालू होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तर मंडप उभारण्याचे काम पाच-सहा दिवसांपूर्वीच सुरू केले होते.
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्‍या पावसाने काल गोवाभरात जोरदार हजेरी लावल्याने काल खरेदीचा बेत आखलेल्या लोकांचे बरीच तारांबळ उडाली. रस्त्या रस्त्यांवर व पदपथांवर माटोळीचे सामान विक्रीसाठी घेऊन बसलेल्या विक्रेत्यांचेही मुसळधार पावसामुळे कधी नव्हे तेवढे हाल झाले.
जोरदार पावसामुळे बाल गोपाळ फटाके खरेदी करण्यास अडचण निर्माण झाल्याने ते पावसाच्या नावाने बोटे मोडताना दिसत होते. पाऊस उद्याही असाच कोसळत राहिल्यास अंगणात फटाके कसे लावावे ही चिंताही तमाम गणेशभक्तांसमोर आहे.
मासळी बाजारात तर कालपासूनच सामसूम दिसत होते. पुढील दोन दिवस तर गोवाभरातील हिंदू धार्मियांचे पाय मासळी बाजारात पडणार नाहीत.
कालपासून घराघरात सजवण्यात आलेल्या मखरात आज गजानन विराजमान होणार आहे. आरत्यांसाठीच्या वाद्यांची व खास करून घुमट व टाळ यांची खरेदीही काल जोरात झाली.