राज्यात आजपासून ‘एसआयआर’ला सुरुवात

0
6

बीएलओंकडून घरोघरी होणार मतदारांची पडताळणी; 4 डिसेंबरपर्यंत मोहीम; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

राज्यात आज (दि. 4) पासून मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाला (एसआयआर) प्रारंभ होत असून, येत्या 4 डिसेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी बीएलओंना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेच्या काळात राज्य पातळीवरील हेल्पलाईन 1950 चोवीस तास कार्यरत राहणार आहे. यापूर्वी वर्ष 2002 मध्ये राज्यातील मतदारयाद्यांचे सखोल पुनरावलोकन करण्यात आले होते.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. संजय गोयल (आयएएस) यांनी आल्तिनो-पणजी येथील कार्यालयात काल एक आढावा बैठक घेतली. या बैठकीला उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, उत्तर आणि दक्षिण एसव्हीईईपी नोडल अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. या बैठकीत राज्यातील एसआयआर मोहिमेबाबत जनजागृतीवर चर्चा करण्याती आली. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात लोकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

एसआयआरमागील कारण काय?
लोकसंख्येचे स्थलांतर : मोठ्या प्रमाणात लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतात. त्यामुळे मतदाराची नावे दोन ठिकाणी नोंदली जातात.
दुहेरी नोंदी : एकाच मतदाराचे नाव जुन्या आणि नव्या दोन्ही ठिकाणी राहते.
मृत मतदारांची नावे : काही वेळा मतदाराच्या मृत्यूनंतरही त्याचे नाव यादीतून वगळले जात नाही.
परदेशी नागरिकांची नोंद : काही ठिकाणी चुकून विदेशी नागरिकांचे नाव मतदारयादीत दिसते.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
1) केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले पेन्शन पेमेंट ऑर्डर, 2) सरकार किंवा स्थानिक संस्था, बँक, पोस्ट ऑफिस, एलआयसी यांनी जारी केलेले प्रमाणपत्र, 3) जन्म प्रमाणपत्र, 4) पासपोर्ट, 5) शैक्षणिक प्रमाणपत्र, 6) कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र, 7) वन हक्क प्रमाणपत्र, 8) जातीचा दाखला, 9) एनआरसी, 10) राज्य किंवा स्थानिक संस्थेने तयार केलेले कुटुंब नोंदणी, 11) जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र.

घरोघरी होणार अर्जांचे वितरण
बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांना अर्जाचे वितरण करून ते भरून घेणार आहेत. येत्या 9 डिसेंबर 2025 रोजी मतदारयादीचा मसुदा जाहीर केला जाणार आहे. 9 डिसेंबर ते 8 जानेवारी 2026 या काळात दावे, हरकती सादर केल्या जाऊ शकतात. 9 डिसेंबर ते 31 जानेवारी या काळात दावे, हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. त्यानंतर, अंतिम मतदारयादी 7 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केली जाणार आहे.

तक्रारींसाठी मतदारसंघनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती
मतदारयादीची पडताळणी पारदर्शक पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदारांची कुठल्याही प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मतदारसंघनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.