राज्यात अवकाळी पावसाची हजेरी

0
28

>> स्पर्धास्थळी पाणी साचल्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर परिणाम

काल पहाटे राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. पहाटेच्या सुमारास विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह राज्यातील विविध भागांत पाऊस कोसळला. सध्या राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा चालू असून, पहाटे कोसळलेल्या पावसामुळे ह्या स्पर्धांच्या विविध स्थळी पाणी साचले होते. परिणामी विविध क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक काल कोलमडले.
राज्यात सोमवारपासून आकाश ढगाळ होते. मंगळवारी देखील दिवसभरात ढगाळ वातावरण दिसून आले होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास पेडणे व अन्य काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर काल पहाटेच्या सुमारास पावसाने जोर धरला. राज्यात अनेक भागांत भातकापणीची कामे शिल्लक असून, त्यावरही या पावसाचा परिणाम झाला.
समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात अवकाळी पाऊस कोसळल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील दोन दिवसही राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

काल अवकाळी पावसादरम्यान कारापूर येथे वीज कोसळण्याची घटना घडली. तसेच मंगळवारी रात्री साखळी येथील चंद्रू नाईक यांच्या घरावर वीज कोसळण्याची घटना घडली. परिणामी घरातील विद्युत उपकरणे निकामी झाली. याशिवाय पाळी पंचायत क्षेत्रातील तळेमाथा येथील लक्ष्मण नाईक यांच्या राहत्या घरावर वीज कोसळून नुकसान झाले. पहाटेची वेळ असल्याने घरात 13 जण उपस्थित होते. या घटनेत एका महिलेला विजेचा किंचित झटका बसला. तसेच घरातील विद्युत उपकरणे देखील निकामी झाली.
दरम्यान, गेल्या 24 तासांत सर्वांधिक पाऊस राजधानी पणजी, मडगाव व दाबोळी येथे झाला. त्याचे प्रमाण 100 मिलमीटर एवढे होते. त्यापाठोपाठ मुरगाव येथे 60.4 मिमी., तर केपे, सांगे, जुने गोवे येथे सुमारे 50 मिमी. एवढ्या पावसाची नोंद झाली.