राज्यात उद्या शनिवार दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते १० या वेळात ३७ समुद्र किनार्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत काल दिली.
केंद्रीय मंत्रालयाकडून आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त देशातील ७५ समुद्रकिनार्यावर स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. त्यात गोव्यातील मिरामार, बोगमाळो, बायणा, वेळसांव आणि कोलवा या पाच समुद्र किनार्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ३७ समुद्र किनार्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील समुद्र किनारे स्वच्छ व सुंदर असल्याचा संदेश जगभरात पाठविला जाणार आहे.
राज्यातील समुद्र किनारे हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या स्वच्छता मोहिमेत संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका यांचा समावेश करून घेतला जाणार आहे. तसेच, पर्यटन क्षेत्रातील संस्था, सरकारी कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. मिरामार येथे होणार्या स्वच्छता कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कळंगुट येथे होणार्या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कोलवा येथे होणार्या कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल उपस्थित राहणार आहेत. राज्यातील स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार्या समुद्र किनार्यावर त्या विभागातील मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांची उपस्थिती होती.
किनारे अमली पदार्थमुक्त असल्याचा संदेश देणार
राज्यातील किनारे स्वच्छतेच्या माध्यमातून किनारे अमलीपदार्थ मुक्त असल्याचा संदेश दिला जाणार आहे. अमलीपदार्थाच्या व्यवहाराचा संशय येणारा प्रत्येक ठिकाणावर कारवाई केली जाणार आहे. राज्यात अमलीपदार्थांना थारा दिला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.